अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. शेतकरी प्रतिनिधी आणि साखर कारखानदार यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेली चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरली. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अखेर किती दर मिळणार, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे. चर्चेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शेतकरी नेते राजू शेट्टी, शेतकरी संघटनेचे रविंद्र मोरे, अभिजित पोटे आणि तोरडकर तात्या यांच्यासह शेतकरी व कारखानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
३७०० रुपयांची मागणी आणि शेजारच्या जिल्ह्यांतील दर
शेतकऱ्यांना पहिली उचल म्हणून ३७०० रुपये द्यावेत, या मागणीवर शेतकरी नेते राजू शेट्टी ठाम आहेत. ऊसतोडींनंतर आणखी १०० रुपये आणि साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपल्यानंतर आणखी २०० रुपये द्यावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. शेजारच्या जिल्ह्यांमध्ये पहिली उचल ३५०० ते ३९०० रुपये दिली जात असून कोल्हापूर जिल्ह्यात ४२०० रुपये दर मिळत आहे. मग नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कमी दर का स्वीकारायचा, असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला. जिल्ह्यातील कारखान्यांनी दरातील ही तफावत दूर करावी, अन्यथा ऊस पळवापळवीचे प्रकार वाढतील आणि त्याचा फटका शेतकरी तसेच कारखानदारीलाही बसेल, असा इशारा त्यांनी दिला.
रिकव्हरीच्या हिशेबाने दर जास्त होतो, तरी मागणी फक्त ३७००
नगर जिल्ह्यातील साखर उतारा क्षमता सोलापूरपेक्षा अधिक असल्याचा दावा शेट्टी यांनी केला. ३४१ रुपये प्रतिटक्का रिकव्हरीच्या हिशेबाने ११ टक्के रिकव्हरीसाठी ३७५१ रुपये दर होतो. मात्र आम्ही ३७५१ रुपयांची मागणी न करता केवळ ३७०० रुपये मागत आहोत, त्यामुळे कारखानदारांनी हा दर देण्यास टाळाटाळ करू नये, असे त्यांनी सांगितले. ऊसदराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेनेही पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. राज्य सहकारी बँकेच्या धर्तीवर जिल्हा बँकेने साखरेचे मूल्यांकन चार हजार रुपयांवरून साडेचार हजार रुपये करावे, असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखानदारांची बैठक सुरू असून त्यातून काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चर्चेतून मार्ग निघाला नाही आणि मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर २८ तारखेपासून आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा शेट्टी यांनी दिला आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा