डिसेंबर महिन्यात परवाना संपणाऱ्या बंदुकांच्या नूतनीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे. मात्र नूतनीकरणासाठी आवश्यक असलेला अर्ज इंग्रजीत उपलब्ध करून देण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांची अडचण होत आहे. विशेषतः शेतीच्या संरक्षणासाठी बंदुकीचा परवाना घेतलेल्या कणकवली तालुक्यातील शेतकऱ्यांना अर्जातील माहिती समजून घेणे आणि ती इंग्रजीत भरणे कठीण जात आहे.
सेतू केंद्रांवरील अर्जही इंग्रजीत
राज्य शासनाकडून मराठी भाषेच्या वापरावर भर दिला जात असून न्यायालयीन कामकाजातही मराठीचा वापर करण्याच्या सूचना आहेत. असे असताना जिल्हा प्रशासनाने बंदूक परवाना नूतनीकरणाचा अर्ज इंग्रजीत उपलब्ध करून दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अनेक शेतकऱ्यांना अर्जातील मजकूर समजत नसल्याने तो भरून घेण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी जावे लागत आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या नूतनीकरणासाठी प्रशासनाने तालुकानिहाय तारखाही जाहीर केल्या आहेत. संबंधित अर्ज तालुकास्तरीय सेतू सुविधा केंद्रांवर उपलब्ध असल्याचे कळविण्यात आले आहे. मात्र तेथील अर्जही इंग्रजीत असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय कायम आहे.
मराठी अर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी
शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन बंदूक परवाना नूतनीकरणाचा अर्ज मराठीतून उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे. प्रशासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करून नूतनीकरण प्रक्रिया सुलभ करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा