गेल्या काही दशकांत झालेल्या अणुबॉम्ब चाचण्यांमधून बाहेर पडलेल्या किरणोत्सर्गी अवशेषांच्या मदतीने शास्त्रज्ञांना आतापर्यंतचा सर्वात वयोवृद्ध नर ऑर्का देवमासा शोधण्यात यश आले आहे. एका नव्या संशोधनातून ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. स्कॉटलंडच्या समुद्रकिनाऱ्यावर गेल्या काही वर्षांत मृतावस्थेत वाहून आलेल्या ऑर्का आणि स्पर्म व्हेल देवमाशांच्या दातांमध्ये मागील दशकांतील अणुचाचण्यांचे किरणोत्सर्गी अवशेष सुरक्षित राहिले होते. त्यांच्या तपासणीतून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
दातांमधील खुणांनी उलगडले वयाचे गुपित
स्कॉटिश युनिव्हर्सिटीज एन्व्हायर्न्मेंटल रिसर्च सेंटरचे संशोधक आणि या अभ्यासाचे प्रमुख लेखक किरण टियर्नी यांनी सांगितले की, या किरणोत्सर्गी अवशेषांमुळे काळाचा अचूक मागोवा घेणारा एक प्रकारचा पुरावा मिळतो, ज्याला बॉम्ब पल्स असे म्हणतात. साधारणपणे नर ऑर्का देवमाशांचे कमाल आयुर्मान ५० ते ६० वर्षे असते, असे मानले जाते. मात्र, १ ऑक्टोबर रोजी फ्रंटियर्स इन मरीन सायन्स या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, किनाऱ्यावर वाहून आलेल्या एका नर ऑर्काच्या दातांमधील रेडिओकार्बन खुणांवरून त्याचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे.
अचूक वय सांगणे शक्य नाही, पण अंदाज खरा ठरू शकतो
रेडिओकार्बन डेटिंगच्या या माहितीवरून देवमाशाचे अगदी अचूक वय सांगता येत नसले, तरी हा अंदाज अशक्यप्राय नसल्याचे संशोधकांच्या पथकाने स्पष्ट केले आहे. निसर्गातील प्राण्यांचे कमाल आयुर्मान मोजणे अत्यंत कठीण असते, कारण प्रत्येक प्राण्यावर लक्ष ठेवून कोणत्या प्रजातीतील कोणता जीव सर्वाधिक काळ जगतो हे पाहणे संशोधकांना शक्य नसते. ऑर्का देवमाशांच्या दीर्घायुष्याबाबत जगभरात फारशी विस्तृत नोंदही उपलब्ध नाही. आययूसीएन इम्पॉर्टंट मरीन मॅमल एरिया स्पेशालिस्ट ग्रुपचे सहअध्यक्ष आणि ऑर्का: द व्हेल कॉल्ड किलर या पुस्तकाचे लेखक एरिक होयट यांनी या निष्कर्षाला दुजोरा दिला आहे. ते या संशोधनाचा भाग नव्हते.
प्रतिक्रिया व्यक्त करा