अल निनोच्या प्रभावामुळे यंदाच्या मान्सूनमध्ये पाऊस कमी पडला आणि त्याचा थेट परिणाम २०२६-२७ च्या खरीप हंगामावर झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तांदूळ, डाळी, मका आणि तेलबियांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. मात्र, हे उत्पादन गेल्या पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याचे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले आहे. हवामानातील प्रतिकूल परिस्थिती आणि मान्सूनला झालेला विलंब यांमुळे खरीप हंगाम अडचणीत आला असला, तरी एकूण उत्पादनाची स्थिती सरासरीपेक्षा चांगली राहील, असा अंदाज कृषी मंत्रालयाने व्यक्त केला आहे.
२०२६-२७ मधील खरीप अन्नधान्य उत्पादन १६७.१४३ दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे. हे उत्पादन गेल्या पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा ९.७६७ दशलक्ष टनांनी अधिक आहे. कापणीच्या वेळी होणाऱ्या पीक कापणी प्रयोगांची प्रत्यक्ष आकडेवारी आल्यानंतर अंतिम सुधारित अंदाज जाहीर केला जाईल, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.
प्रमुख पिकांचे उत्पादन घटले
कृषी मंत्रालयाच्या प्राथमिक अंदाजानुसार गेल्या वर्षीच्या खरीप हंगामाच्या तुलनेत यंदा प्रमुख पिकांच्या उत्पादनात लक्षणीय घट नोंदवली गेली आहे. तांदळाचे उत्पादन २.२८ टक्क्यांनी घटून १२१.९ दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे; गेल्या वर्षी ते १२४.७५ दशलक्ष टन होते. डाळींचे उत्पादन ६.१८ टक्क्यांनी घटून ७.१३ दशलक्ष टन, तर तेलबियांचे उत्पादन १०.२० टक्क्यांनी कमी होऊन २३.९४ दशलक्ष टन राहील. यामध्ये सोयाबीनचे उत्पादन २.३५ दशलक्ष टनांनी घटून १०.२४ दशलक्ष टनांवर आले आहे.
इथेनॉल आणि कुक्कुटपालन उद्योगासाठी महत्त्वाच्या असलेल्या मक्याच्या उत्पादनात १४.५ टक्क्यांची मोठी घसरण झाली असून ते २६.०६ दशलक्ष टन राहण्याची शक्यता आहे. खरीप उत्पादनातील ही घट शेतकऱ्यांसह अन्नधान्य बाजारासाठी चिंतेची ठरू शकते.
महागाईची भीती; सरकारकडून उपाययोजना
साखर धोरणातील गैरव्यवस्थापनामुळे साखरेच्या किमतींनी १६ वर्षांचा उच्चांक गाठला असून भारताला १० लाख टन साखर आयात करावी लागली आहे. खरीप उत्पादनातील घट आणि रब्बी पेरण्यांना झालेला विलंब यामुळे आगामी काळात अन्नधान्य महागाई वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार तांदूळ आणि गव्हावर निर्यात शुल्क लावण्याच्या विचारात आहे.
एकूणच, उत्पादन सरासरीपेक्षा अधिक राहणार असले तरी प्रमुख पिकांमधील घट आणि महागाईचा धोका यामुळे आगामी हंगामाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंतिम आकडेवारी आल्यानंतर खरीप उत्पादनाची नेमकी स्थिती स्पष्ट होईल.
प्रतिक्रिया व्यक्त करा