अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या ऊसदराच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. शेतकरी नेते, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि साखर कारखानदार यांच्यात झालेल्या बैठकीत ऊसदराचा तिढा सुटला आहे. या बैठकीत उसाला प्रतिटन ३,४५० रुपये दर देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पहिली उचल ३,२५० रुपये, उर्वरित रक्कम दोन टप्प्यांत
निश्चित झालेल्या दरानुसार शेतकऱ्यांना पहिली उचल म्हणून ३,२५० रुपये मिळणार आहेत. उर्वरित २०० रुपये दोन टप्प्यांत प्रत्येकी १०० रुपये या प्रमाणे दिले जाणार आहेत. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात वेळेत रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न चांगलाच तापला होता. शेतकरी संघटनांनी उसाला योग्य दर मिळावा, यासाठी आंदोलनाची भूमिका घेतली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ३,७०० रुपये पहिली उचल देण्याची मागणी केली होती. मागणी मान्य न झाल्यास २८ नोव्हेंबरपासून रास्तारोको आणि रेलरोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
बैठकीत तिढा सुटला, शेतकऱ्यांना दिलासा
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी प्रतिनिधी आणि साखर कारखानदार यांच्यात बैठक झाली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किती दर द्यायचा, यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. अखेर प्रतिटन ३,४५० रुपये दर निश्चित करण्यावर सहमती झाली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ३,२५० रुपये दिले जाणार असून, उर्वरित २०० रुपये दोन टप्प्यांत अदा केले जाणार आहेत.
दराचा तिढा सुटल्यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली अनिश्चितता आता संपली असून, शेतकऱ्यांना ठरलेल्या दरानुसार रक्कम मिळणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा