करमाळा तालुक्यातील चिकलठाण गावच्या ग्रामसभेने उजनी जलाशयाच्या फुगवट्यावर उभारण्यात येणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता डेटा सेंटरसह प्रस्तावित चारही प्रकल्पांना ठाम विरोध दर्शवला आहे. गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात झालेल्या ग्रामसभेत या सर्व प्रकल्पांना रद्द करण्याचा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला. या सभेत महिला पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
ग्रामसभेत एकमुखी ठराव
महिला सरपंच धनश्री गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा पार पडली. उजनी जलाशयावर प्रस्तावित असलेले सर्व प्रकल्प रद्द करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी एका आवाजात केली. या सभेला ग्रामविकास अधिकारी नवनाथ केकान आणि ग्राम महसूल अधिकारी अमोल गायकवाड यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेत प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा झाली आणि शेवटी सर्वांनी एकमताने विरोधाचा ठराव मंजूर केला.
पाणी, शेती आणि पर्यावरणाची चिंता
उजनीवरील प्रकल्पांमुळे पाणी, शेती, मत्स्यव्यवसाय आणि पर्यावरणावर काय परिणाम होऊ शकतात, याबाबत ग्रामस्थांनी सभेत चिंता व्यक्त केली. उजनी जलाशय हा परिसरातील शेतकरी, मच्छीमार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे जलाशयाशी संबंधित कोणतेही प्रकल्प स्थानिकांच्या हिताचा विचार करूनच राबवावेत, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली. या प्रकल्पाला जगभरात होत असलेल्या विरोधाचा अभ्यास करूनच हा निर्णय घेतल्याचे सरपंचांनी सांगितले. कसल्याही परिस्थितीत आणि कोणत्याही मोबदल्यात हा प्रकल्प होऊ देणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
प्रतिक्रिया व्यक्त करा