सोशल मीडियावर सध्या कच्च्या दुधाची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक व्हिडीओ आणि पोस्टमधून कच्चं दूध हे आरोग्याचा खजिना असल्याचं सांगितलं जात आहे. दूध उकळलं किंवा गरम केलं की त्यातील सर्व पोषक तत्त्वं नष्ट होतात, असा दावाही केला जातो. काही जण तर कच्चं दूध प्यायल्याने अॅलर्जी, दमा आणि पोटाच्या तक्रारींपासून आराम मिळतो, असंही सांगत आहेत. हे दावे ऐकून अनेकांनी नेहमीचं दूध सोडून कच्च्या दुधाकडे वळण्याचा विचार सुरू केला आहे. पण कच्चं दूध खरंच इतकं फायदेशीर आहे का, यावर तज्ज्ञांचं म्हणणं वेगळंच आहे.
कच्चं दूध म्हणजे काय?
कच्चं दूध म्हणजे असं दूध, ज्यावर सुरक्षिततेसाठी कोणतीही उष्णता प्रक्रिया केलेली नसते. म्हणजेच ते गरम केलेलं नसतं किंवा त्याचं पाश्चरायझेशन केलेलं नसतं. पाश्चरायझेशन ही दूध सुरक्षित करण्याची वैज्ञानिक पद्धत आहे. यात दूध एका ठराविक तापमानावर गरम करून त्यातील रोग पसरवणारे धोकादायक जिवाणू नष्ट केले जातात. कच्च्या दुधात मात्र असे जिवाणू जिवंत राहू शकतात आणि त्यामुळे माणूस गंभीर आजारी पडू शकतो.
कच्च्या दुधात आढळू शकणाऱ्या दोन प्रमुख जिवाणूंबद्दल तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. लिस्टेरिया हा जिवाणू शरीरात संसर्ग निर्माण करू शकतो. गरोदर महिला आणि कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींसाठी तो विशेषतः धोकादायक ठरू शकतो. साल्मोनेला हा जिवाणू पोट आणि आतड्यांमध्ये संसर्ग निर्माण करतो. त्यामुळे उलट्या, जुलाब, ताप आणि गंभीर आजार होऊ शकतो. या धोक्यांमुळेच ऑस्ट्रेलियामध्ये मानवी सेवनासाठी कच्चं दूध विकणं बेकायदेशीर आहे.
गरम केलेलं दूध आणि पोषण
कच्च्या दुधाच्या समर्थनात सर्वात मोठा दावा असा केला जातो की, दूध गरम केल्याने त्यातील पोषक तत्त्वं नष्ट होतात. मात्र वैज्ञानिक पुरावे या दाव्याला दुजोरा देत नाहीत. संशोधनानुसार, दूध गरम केल्याने त्यातील प्रथिनांच्या गुणवत्तेवर कोणताही विशेष परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे कॅल्शियमसारख्या आवश्यक खनिजांच्या प्रमाणावरही परिणाम होत नाही. थोडक्यात, गरम केलेल्या दुधाच्या तुलनेत कच्चं दूध प्यायल्याने शरीराला कोणतंही विशेष अतिरिक्त पोषण मिळत नाही.
तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे की, कच्चं दूध प्यायल्याने कोणताही अतिरिक्त फायदा होत नाही; उलट त्याच्या सेवनाने आरोग्याला अपाय होण्याचा धोका मात्र नक्कीच वाढतो. त्यामुळे सोशल मीडियावरील दाव्यांवर विश्वास ठेवून कच्चं दूध पिण्याऐवजी पाश्चराइज्ड आणि सुरक्षित दूध पिणंच योग्य ठरेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा