वाशिम शहरावर पाणीटंचाईचे सावट गडद होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात सध्या केवळ ३२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अपेक्षित पाऊस न झाल्याने प्रकल्पात पुरेसा जलसाठा होऊ शकला नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याचे महत्त्व नागरिकांना जाणवू लागले आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात शहराला पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे हे नगरपालिका प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे.
नागरिकांना काटकसरीचे आवाहन
नगराध्यक्ष अनिल केंदळे यांनी वाशिमकरांना आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आणि उपलब्ध जलसाठ्याचे जतन करण्याचे आवाहन केले आहे. नगराध्यक्ष केंदळे आणि मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन केले आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करून तो उन्हाळ्यापर्यंत पुरविण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनावर आहे.
अपव्यय रोखण्यासाठी कठोर पावले
शहरात काही ठिकाणी नळ सुरू ठेवून वाहने धुणे, अंगण स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा अनावश्यक वापर करणे, पाण्याच्या टाक्या भरल्यानंतरही मोटार सुरू ठेवणे तसेच नळगळतीकडे दुर्लक्ष करणे, अशा प्रकारांमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्यात येणार आहेत. ज्या नागरिकांच्या नळ कनेक्शनला तोट्या बसविण्यात आलेल्या नाहीत, त्यांच्यावर कारवाई करून दंड आकारण्यात येणार असल्याचा इशाराही नगरपालिकेने दिला आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा