कधीही न बुडणारं जहाज अशी जाहिरात करून इंग्लंडहून अमेरिकेकडे निघालेलं टायटॅनिक जहाज आपल्या पहिल्याच सफरीत, अवघ्या चार दिवसांच्या प्रवासानंतर हिमनगाला धडकून अटलांटिक महासागरात बुडालं. १५ एप्रिल १९१२ रोजी झालेल्या या दुर्घटनेत १५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या जहाजाच्या माहितीवर आधारित हॉलीवूडचा टायटॅनिक चित्रपट जगभर गाजला. त्या दिवसापासून या जहाजाचे अवशेष समुद्रपृष्ठापासून सुमारे १२,५०० फूट खाली आहेत. हे अवशेष १९८५ मध्ये शोधून काढण्यात आले होते, पण ते तिथेच आहेत. त्यांना बाहेर काढलेलं नाही. ११४ वर्षं उलटूनही हे अवशेष समुद्रतळाशीच का आहेत, यामागे अनेक कारणं आहेत.
प्रचंड खोली आणि दाब
टायटॅनिक जहाज समुद्रपृष्ठापासून सुमारे १२,५०० फूट खोल खाली आहे. इतक्या खोलीवर पाण्याचा दाब पृष्ठभागाच्या तुलनेत सुमारे ३८० पटीने अधिक, म्हणजेच साधारण ५५०० ते ६००० पीएसआय इतका असू शकतो. अशा परिस्थितीत सामान्य उपकरणं काम करू शकत नाहीत. त्यामुळे विशेष खोल-समुद्री पाणबुड्या आणि रिमोटद्वारे चालणारी वाहनं वापरणं आवश्यक असतं. एवढ्या अवाढव्य अवशेषांना बाहेर काढण्यासाठी त्यांना घट्ट पकडून वर उचलण्यास सक्षम अशा उपकरणांची गरज पडेल. मात्र दाबामध्ये होणारे बदल आणि जहाजाची सध्याची अत्यंत नाजूक अवस्था यामुळे त्याला अधिक नुकसान पोहोचण्याची शक्यता आहे.
गंज आणि नाजूक रचना
समुद्राचं पाणी, रासायनिक प्रक्रिया आणि सूक्ष्मजीवांमुळे टायटॅनिकचं लोखंड हळूहळू नष्ट होत आहे. २०१० मध्ये शास्त्रज्ञांना जहाजाच्या गंजलेल्या भागात हॅलोमोनास टायटॅनिके नावाचा बॅक्टेरिया आढळला. यामुळे लोखंडाला गंज लागण्याची प्रक्रिया वेगाने होते. त्यामुळे जहाजावर गंजाच्या बर्फासारख्या रचना तयार झाल्या आहेत. बुडताना टायटॅनिकचे दोन मोठे तुकडे झाले. त्याचे पुढचे आणि मागचे भाग समुद्राच्या तळाशी सुमारे २००० फूट अंतरावर पडले आहेत. दोन्ही भाग अत्यंत कमकुवत झाले असल्याने त्यांना बाहेर काढणं कठीण आहे.
११४ वर्षांहून अधिक काळ समुद्रात असल्यामुळे टायटॅनिकचं लोखंड कमकुवत झालं आहे. ते बाहेर काढताना तुटण्याची शक्यता आहे. तसंच हवेशी संपर्क आल्यावर गंज रोखण्यासाठी विशेष वैज्ञानिक प्रक्रिया करावी लागेल. २०१२ मध्ये टायटॅनिकचा समावेश युनेस्कोच्या समुद्राखालील सांस्कृतिक वारसा संरक्षणाच्या करारांतर्गत झाला. या कराराचा उद्देश जहाजाचं संरक्षण करणं आणि त्यातील वस्तूंची लूट किंवा व्यावसायिक वापर रोखणं हा आहे. अमेरिका आणि ब्रिटननेही त्याच्या संरक्षणासाठी नियम लागू केले आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा