, २८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

शिक्षकांनी शिकवावं की पोर्टल भरावं? सरकारचा मोठा निर्णय

शिक्षकांनी वर्गात शिकवावं की दिवसभर सरकारी पोर्टलवर माहिती भरावी? आता राज्य सरकारने अशैक्षणिक कामांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तरतूद काय, जाणून घ्या.

शिक्षकांनी शिकवावं की पोर्टल भरावं? सरकारचा मोठा निर्णय

शाळेतील शिक्षकाच्या हातात पुस्तक असावं की सरकारी योजनांच्या माहितीने भरलेला मोबाईल, वर्गात विद्यार्थ्यांना शिकवायचं की दिवसभर वेगवेगळ्या पोर्टलवर माहिती भरत बसायचं, हे प्रश्न अनेक वर्षांपासून अनुत्तरित आहेत. शिक्षकांच्या विषयज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांची आकलनक्षमता वाढवणं, जिज्ञासा जागवणं आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठीच व्हायला हवा. प्रत्यक्षात शिक्षकांचा वापर सर्वेक्षण, माहिती संकलन, ऑनलाईन नोंदणी, योजनांच्या लाभार्थ्यांची पडताळणी, विविध अभियानांची अंमलबजावणी अशा कामांसाठी शासन यंत्रणा वर्षानुवर्षे हक्काने करत आली. हरकाम्या नोकराप्रमाणे सरकारी कामांत जुंपण्यामुळे शिक्षकांवर इतर कामांचा बोजा इतका वाढला की, अध्यापनाला दुय्यम स्थान मिळू लागलं. शिक्षक संघटनांनी आजवर हा अतिरिक्त भार कमी व्हावा, यासाठी मागणी केली, आंदोलनं केली; पण प्रयत्न निष्फळ ठरले.

कायद्यातील तरतूद काय?

आता राज्य सरकारने जनगणना, निवडणुका आणि आपत्ती व्यवस्थापन या तीन अपवादांखेरीज शिक्षकांना अशैक्षणिक कामं देण्यास प्रतिबंध करणारी कायदेशीर तरतूद करण्याचं ठरवलं आहे. खासगी अनुदानित शाळांसाठी प्रस्तावित सर्वसमावेशक कायद्यातील ही तरतूद शिक्षकांना दिलासा देणारी आहे. खासगी शाळांचं कामकाज १९७७ च्या कायद्यानुसार चालतं. त्यात अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांसाठी स्वतंत्र तरतुदी नव्हत्या. सरकारी अनुदान घेणाऱ्या शाळांवर सरकारचं थेट आर्थिक नियंत्रण आणि उत्तरदायित्व असतं. खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांचं वेतन शासन देतं; मात्र शाळांचं व्यवस्थापन खासगी संस्थाचालकांकडे असतं. अनेक संस्थाचालक शिक्षकांकडून इतर प्रशासकीय कामं, निधी संकलन किंवा बाह्य उपक्रम करवून घेतात. या विधेयकानुसार शाळांच्या निधी संकलनावरही बंदी घातली आहे. शिक्षकांना अध्यापनावर लक्ष केंद्रित करता यावं, हा यामागचा मुख्य हेतू आहे.

किती शाळा, किती शिक्षक?

जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिका शाळांमधील शिक्षक हे थेट स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी असल्याने त्यांच्या अशैक्षणिक कामांबाबत ऑगस्ट २०२४ मध्येच स्वतंत्र शासन निर्णय काढून कामांचं वर्गीकरण केलं होतं; मात्र शासन निर्णयापेक्षा कायद्याचं बंधन अधिक कठोर असल्याने खासगी अनुदानित शाळांसाठी थेट विधेयकात तरतूद केली गेली. खासगी विनाअनुदानित शाळांना सरकारकडून निधी मिळत नसल्याने त्यांचं आर्थिक आणि प्रशासकीय नियोजन पूर्णपणे खासगी व्यवस्थापनाच्या अखत्यारीत राहतं. सरकार त्यांच्या अंतर्गत कामकाजात थेट कायदेशीर हस्तक्षेप करू शकत नाही. महाराष्ट्रातील २५ हजार ४९५ खासगी अनुदानित शाळांमध्ये २.७६ लाख शिक्षक कार्यरत असून ९८.०६ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या तरतुदीमुळे एवढ्या मोठ्या संख्येने शिक्षकांना अध्यापनावर लक्ष केंद्रित करता येणार आहे.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance