ठाणे शहरात गौण खनिजाच्या अनधिकृत उत्खननाबाबत महसूल विभागाने कठोर पाऊल उचलले आहे. ठोठावलेला दंड दीर्घकाळ न भरल्याने संबंधित बांधकाम कंपनीच्या मालमत्तेवर मंगळवारी जप्तीची कारवाई करण्यात आली. मुख्य प्रवेशद्वार सील करून प्रशासनाने थकबाकीदार कंपनीला स्पष्ट इशारा दिला आहे.
३,५४१ ब्रास मातीचे अनधिकृत उत्खनन
ठाण्यातील मौजे कासारवडवली ते भाईंदरपाडा परिसरात सुरू असलेल्या कामासाठी तीन हजार पाचशे एक्केचाळीस ब्रास मातीचे अनधिकृत उत्खनन झाल्याचे महसूल विभागाच्या निदर्शनास आले होते. या प्रकरणी ठाणे तहसीलदार कार्यालयाने ८ जुलै २०२५ रोजी दंडात्मक आदेश काढून जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीला दोन कोटी ७२ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.
दंड भरण्यासाठी वारंवार मुदत देऊनही निर्धारित कालावधीत ही रक्कम जमा झाली नाही. अखेर थकीत दंडाच्या वसुलीसाठी प्रशासनाला जप्तीची कारवाई करावी लागली.
दुपारी पथकाची धडक कारवाई
मंगळवारी दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास बाळकुम मंडळ अधिकाऱ्यांच्या पथकाने ठाणे पश्चिम येथील स्वामी विवेकानंद मार्गावरील संबंधित मालमत्तेवर धडक दिली. जप्तीची नोटीस मालमत्तेवर चिकटवण्यात आली आणि मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकून मालमत्ता अधिकृतपणे सील करण्यात आली.
या कारवाईनंतर संबंधित मालमत्तेची विक्री, देणगी अथवा अन्य कोणत्याही प्रकारे हस्तांतरण करण्यास प्रशासनाने मनाई केली आहे.
Leave a Reply