समाजमाध्यमावर सध्या एक खुले पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे पत्र वाचून अनेकांना धक्का बसला आहे. हे पत्र कोणत्याही सामान्य व्यक्तीचे नसून निकोला जुरकोविच यांचे आहे. निकोला हे एमईटीआर नावाच्या नफा न मिळवणाऱ्या संस्थेत तांत्रिक कर्मचारी म्हणून काम करतात. या संस्थेचे कामच प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालींमुळे निर्माण होणारे संभाव्य धोके तपासणे हे आहे.
संपूर्ण जग थँक्सगिव्हिंगच्या सुट्टीत कुटुंबीयांसोबत आनंद साजरा करत असताना निकोला यांनी आपल्या कुटुंबीयांना उद्देशून हे खुले पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी अत्यंत गंभीर इशारा दिला आहे. त्यांच्या मते, कृत्रिम बुद्धिमत्तेची वेगवान प्रगती परिस्थिती हाताबाहेर नेत आहे आणि २०२७ पर्यंत मोठा धोका निर्माण होऊ शकतो. यंदाचा थँक्सगिव्हिंग हा त्यांच्या आयुष्यातील पहिलाच असा प्रसंग आहे, जेव्हा पुढील वर्षीचा थँक्सगिव्हिंग साजरा करण्यासाठी आपण जिवंत असू की नाही, याचीही त्यांना खात्री वाटत नाही, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
तज्ज्ञांनी मांडलेले तीन मोठे धोके
निकोला यांच्या मते, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जगासमोर प्रामुख्याने तीन प्रकारचे धोके निर्माण होऊ शकतात. पहिला धोका म्हणजे प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली मानवी नियंत्रणाबाहेर जाण्याचा. अशा प्रणालींनी वीज, पाणीपुरवठा किंवा बँकिंगसारख्या महत्त्वाच्या सेवांवर सायबर हल्ले केले, तर मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण होऊ शकतो.
दुसरा धोका म्हणजे गुन्हेगार किंवा चुकीच्या विचारांच्या व्यक्ती कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जैविक शस्त्रे तयार करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे मानवी सुरक्षेला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. तिसरा धोका म्हणजे जागतिक नेते आणि निर्णय घेणाऱ्या यंत्रणांनी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालींना गरजेपेक्षा जास्त अधिकार देणे. अशा परिस्थितीत महत्त्वाचे निर्णय घेण्याची प्रक्रिया मानवी नियंत्रणातून बाहेर जाण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
निकोला यांनी आणखी एक गंभीर शक्यता मांडली आहे. त्यांच्या मते, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली स्वतःमध्ये सुधारणा करण्याच्या क्षमतेपर्यंत पोहोचल्या, तर २०२७ च्या सुरुवातीपर्यंत त्या जगातील सर्वात बुद्धिमान माणसांनाही मागे टाकू शकतात. अशा परिस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्ता स्वतःची उद्दिष्टे ठरवू लागली आणि ती उद्दिष्टे मानवी हिताच्या विरोधात गेली, तर परिस्थिती हाताळणे कठीण होऊ शकते. इतकेच नाही, तर २०३० च्या अखेरपर्यंत मानवी अस्तित्वाला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता ५० टक्के असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
कुटुंबीयांना दिलेला सल्ला आणि उपाय
या संभाव्य धोक्यांच्या पार्श्वभूमीवर निकोला यांनी त्यांच्या कुटुंबीयांना काही व्यावहारिक सूचना दिल्या आहेत. त्यांच्या मते, २०२७ हे वर्ष कोविड महामारीपेक्षाही अधिक अस्थिर ठरू शकते. त्यामुळे कुटुंबीयांनी संभाव्य आपत्कालीन परिस्थितीसाठी आधीपासून तयारी ठेवावी. घरात किमान दोन आठवड्यांचा अन्नसाठा आणि पिण्याचे पाणी ठेवावे. काही प्रमाणात रोख रक्कम जवळ ठेवावी. मोठ्या प्रमाणावर सायबर हल्ले झाल्यास ऑनलाइन बँकिंग आणि डिजिटल पेमेंट सेवा विस्कळीत होऊ शकतात, याचीही तयारी ठेवावी, असे त्यांनी सुचवले आहे.
निकोला यांनी केवळ मानवी सुरक्षेचाच मुद्दा उपस्थित केलेला नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या संभाव्य परिणामांकडेही लक्ष वेधले आहे. पुढील दहा वर्षांत आज अस्तित्वात असलेल्या अनेक नोकऱ्यांचे स्वरूप बदलू शकते किंवा काही नोकऱ्या पूर्णपणे संपुष्टात येऊ शकतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील एक ते पाच वर्षांत शिक्षण, करिअर आणि कुटुंब नियोजनासारख्या सामान्य आयुष्याशी संबंधित गोष्टींवरही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रभावाचा परिणाम होऊ शकतो, असे मत त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संभाव्य धोक्यांबाबत चिंता व्यक्त करणारे निकोला हे एकमेव तज्ज्ञ नाहीत. या क्षेत्रातील प्रसिद्ध संशोधक योशुआ बेंजिओ यांनीही मानवी अस्तित्वासमोर निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांबाबत इशारा दिला आहे. गॉडफादर ऑफ एआय म्हणून ओळखले जाणारे जेफ्री हिंटन यांनीही सुपरइंटेलिजन्सवर नियंत्रण मिळवण्याआधी त्याचा विकास करणे धोकादायक ठरू शकते, असे मत व्यक्त केले आहे. अँथ्रॉपिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी डारियो अमोदेई यांनीही पुढील एक ते पाच वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सुरुवातीच्या स्तरावरील अनेक व्हाइट कॉलर नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली आहे.
निकोला यांच्या मते, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासावर नियंत्रण ठेवण्यासाठी जगभरात कठोर नियम तयार करण्याची गरज आहे. यासाठी युरोपियन युनियनच्या कृत्रिम बुद्धिमत्ता कायद्याचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, तंत्रज्ञानासाठी सुरक्षेचे कडक निकष निश्चित केले, तर मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनाही त्यांचे पालन करावे लागू शकते. सामान्य नागरिकांनी जागरूक राहावे, सरकारकडे कठोर नियमांची मागणी करावी आणि संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता सुरक्षा क्षेत्रात काम करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. २०२७ मध्ये कोविडपेक्षाही मोठे संकट येणार, हा दावा सध्या निश्चित मानता येत नसला, तरी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या क्षमतेवर नियंत्रण, सायबर सुरक्षा आणि मानवी सुरक्षिततेबाबत गंभीर चर्चा होणे गरजेचे आहे, असा या पत्राचा एकूण सूर आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा