रोजच्या खरेदीत पॅकेटबंद खाद्यपदार्थ घेताना ग्राहकांना आता एक महत्त्वाचा बदल दिसणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने अशा पदार्थांवर आरोग्याचा इशारा देणे सक्तीचे केले आहे. ज्या पदार्थांत मीठ, साखर आणि संतृप्त चरबीचे प्रमाण जास्त आहे, त्यांच्या पॅकेटच्या दर्शनी भागावर आता मोठ्या अक्षरांत वैधानिक इशारा छापावा लागणार आहे. संविधान दिनाच्या दिवशी हा निर्णय देताना न्यायालयाने आरोग्याचा अधिकार हा संविधानात अधोरेखित असल्याचे नमूद केले. हा निर्णय आजपासूनच लागू होणार असून त्यामुळे देश निरोगी होण्याच्या दिशेने वाटचाल करेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
पॅकेटच्या दर्शनी भागावर मोठा लाल इशारा
नव्या आदेशानुसार चरबी, साखर आणि मिठ या तिन्ही घटकांसाठी वेगवेगळा लाल रंगाचा षटकोनी इशारा लावावा लागणार आहे. या इशाऱ्यावर एक स्पष्ट चित्र असेल आणि त्यावर मोठ्या अक्षरांत HIGH FAT, HIGH SUGAR किंवा HIGH SALT असे लिहिलेले असेल. हा षटकोन पॅकेटच्या दर्शनी भागाच्या किमान चार ते पाच टक्के भाग व्यापेल, जेणेकरून ग्राहकांना तो सहज वाचता येईल. केवळ जोडलेली साखर नव्हे, तर पॅकेटमधील एकूण साखर, संतृप्त चरबी आणि मिठाचे प्रमाण लक्षात घेऊन हा इशारा द्यावा लागणार आहे. त्यासाठीच्या मर्यादा नव्याने ठरवाव्या लागतील. डीजीआय 2024 चा तक्ता 15.1 जसाच्या तसा लागू करता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
यापूर्वी अन्न सुरक्षा प्राधिकरणाने दिलेल्या एका प्रस्तावावरही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले होते. कंपन्यांना स्वतःच्या मर्जीने नियम तयार करण्यासाठी 365 दिवसांचा कालावधी देणे आणि नव्याने सल्लामसलत करण्याची मुभा देणे, या मुद्द्यांवर न्यायालयाने आक्षेप घेतला होता. आता मात्र या आदेशाचे पालन बंधनकारक असून कोणतीही दिरंगाई चालणार नाही, असे कडक शब्दांत सांगण्यात आले आहे.
चार महिन्यांत नियम, शाळांमध्ये पोषण शिक्षण
अन्न सुरक्षा प्राधिकरणाला मसुदा नियम तयार करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर पुढील दहा दिवसांत प्राधिकरणाला आपला प्रगती अहवाल न्यायालयात सादर करावा लागणार आहे. त्यामुळे या विषयावर किती काम झाले, हे स्पष्ट होईल.
केवळ पॅकेटवर इशारा देऊन थांबायचे नाही, तर मुलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावरही न्यायालयाने भर दिला आहे. आता देशभरातील शाळांमध्ये पोषण साक्षरतेचे शिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात बदल केला जाईल आणि खास कार्यशाळा आयोजित केल्या जातील. लहानपणापासूनच मुलांना योग्य प्रशिक्षण मिळाले, तर ती भविष्यात जंक फूडपासून दूर राहतील, असे न्यायालयाने म्हटले आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना खरेदी करताना अधिक माहिती मिळेल आणि आरोग्यदायी निवड करणे सोपे होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा