कोलेस्ट्रॉल म्हटलं की सर्वात आधी हृदयाच्या आरोग्याचा विचार केला जातो. रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या नसांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. पण कोलेस्ट्रॉल फक्त हृदयाच्या नसांमध्येच साचतं असं नाही. ते पायांच्या नसांमध्येही जमा होऊ शकतं. या समस्येला वैद्यकीय भाषेत पेरिफेरल आर्टरी डिसीज असं म्हणतात. वेळीच उपचार न केल्यास या आजाराची तीव्रता वाढू शकते. त्यामुळे पायांच्या पेशींना नुकसान पोहोचू शकतं. गंभीर परिस्थितीत गँगरीन होऊन पाय कापण्याची वेळही येऊ शकते.
पायांच्या नसांत प्लाक कसा तयार होतो
हृदयरोग विभागातील प्राध्यापक डॉ. तरुण कुमार यांच्या सांगण्यानुसार, हृदयातून पायांपर्यंत रक्त पोहोचवण्यासाठी शरीरात अनेक रक्तवाहिन्या असतात. रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं की ते या रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतींवर जमा होऊ लागतं. हळूहळू त्यामध्ये कॅल्शियम आणि सूज निर्माण करणाऱ्या पेशी जमा होतात. यामुळे एक थर तयार होतो. यालाच प्लाक असं म्हणतात. हा प्लाक वाढत गेल्याने रक्तवाहिन्यांमधील रक्त जाण्याचा मार्ग अरुंद होतो. परिणामी पायांपर्यंत पुरेसं रक्त आणि ऑक्सिजन पोहोचत नाही.
लक्षणे आणि तपासणी
या आजाराचं सर्वात सामान्य लक्षण म्हणजे चालताना पाय दुखणं किंवा पायांच्या स्नायूंमध्ये गोळे येणं. वाढतं वय आणि किडनीचा दीर्घकाळ असलेला आजार यामुळेही या समस्येचा धोका वाढू शकतो. हा आजार आहे की नाही, हे तपासण्यासाठी डॉक्टर एंकल ब्रॅकियल इंडेक्स ही चाचणी करण्याचा सल्ला देऊ शकतात. या चाचणीमध्ये हाताचा आणि घोट्याजवळील रक्तदाब मोजून त्यांची तुलना केली जाते. गरज पडल्यास डॉप्लर अल्ट्रासाऊंड चाचणीही केली जाते. या तपासणीमुळे पायांमधील रक्तप्रवाह कसा आहे आणि रक्तवाहिन्यांमध्ये कुठे अडथळा निर्माण झाला आहे का, हे समजण्यास मदत होते. ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय निर्णय घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा