अमेरिकेतील मिसिसिपी किनारपट्टीजवळ मंगळवारी एक छोटे विमान समुद्रात कोसळले. या अपघातात फ्लोरिडा येथील एका कुटुंबातील सहा सदस्यांचा मृत्यू झाला. ते मासेमारीवरून परत येत होते. बराच वेळ शोध घेतल्यानंतर यूएस कोस्ट गार्ड आणि बचाव पथकांनी विमानाच्या ढिगाऱ्यातून सर्व सहा मृतदेह बाहेर काढले.
मृतांची ओळख पायलट ब्रेंट स्टोक्स (५०), त्यांचा १६ वर्षांचा मुलगा हंटर स्टोक्स, त्यांची बहीण अर्लीन नॉक्स (४३), मेहुणे मायकल नॉक्स (४३) आणि त्यांचे दोन मुलगे चार्ल्स होल्डन नॉक्स (१२) व ट्रूएट नॉक्स (१०) अशी पटली आहे.
जॅक्सन काउंटीचे वैद्यकीय परीक्षक ब्रूस लिंड ज्युनियर यांच्या मते, ब्रेंट स्टोक्स हे फोर्ट मायर्स येथील एका सागरी कंत्राटदार कंपनीचे अध्यक्ष होते. अर्लीन आणि मायकल नॉक्स यांनी २०१२ मध्ये त्यांची आयटी कंपनी, नॉक्स टेक्नॉलॉजीज, स्थापन केली होती.
कुटुंबाचे संयुक्त निवेदन
दोन्ही कुटुंबांनी एक संयुक्त निवेदन जारी करून सर्व सहा जणांच्या मृत्यूची पुष्टी केली. निवेदनात म्हटले आहे की, ते सर्वजण त्यांना आवडणारे काम करत असतानाच मरण पावले. ते कुटुंबासोबत सुट्टीचा आनंद घ्यायला गेले होते आणि त्याचवेळी हा अपघात घडला.
यूएस कोस्ट गार्डच्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी ३:४५ च्या सुमारास अलाबामातील मोबाईल येथील प्रादेशिक विमान वाहतूक नियंत्रण टॉवरचा विमानाशी संपर्क तुटला. विमान न्यू ऑर्लिन्सहून फोर्ट मायर्स, फ्लोरिडाकडे जात होते. सेसना २१० हे विमान मेक्सिकोच्या आखातात, मिसिसिपीजवळ, पास्कागौला आणि हॉर्न आयलंडच्या दरम्यान कोसळले.
प्राथमिक शोधादरम्यान बचाव पथकाला पाण्यात तरंगणारे तीन लाईफ जॅकेट, एक लाईफ राफ्ट आणि विमानाची केबिन सापडली. नंतर डायव्हर्सनी विमानाच्या बाह्य कवचातून सर्व सहा मृतदेह बाहेर काढले.
अपघाताचे कारण शोधले जात आहे
हवामान आणि उड्डाण डेटाच्या आधारे अपघाताच्या कारणाचा तपास केला जात आहे. उड्डाणानंतर विमानाने कोणत्याही तांत्रिक समस्येची माहिती दिली नाही, तसेच वैमानिकाने कोणताही आपत्कालीन संदेश पाठवला नाही. संपर्क तुटण्याच्या काही वेळापूर्वी विमान वाहतूक नियंत्रणाने वैमानिकाला परिसरातील पाऊस आणि खराब हवामानाबद्दल माहिती दिली होती.
उड्डाण तज्ज्ञ आणि बोईंगचे माजी सुरक्षा अभियंता टॉड कर्टिस यांच्या मते, सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या विमान वाहतूक रेकॉर्डिंगमध्ये काहीही असामान्य आढळले नाही. शून्य अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात पाऊस किंवा आर्द्रतेमुळे विमानांच्या पंखांवर बर्फ तयार होऊ शकतो. यामुळे उपकरणांचे वाचन चुकीचे होऊ शकते आणि विमानाच्या उचल क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले.
फ्लाइट ट्रॅकिंग डेटाच्या विश्लेषणानुसार, विमान अंदाजे ९,००० फूट उंचीवर उडत होते. त्यानंतर ते अचानक वेगाने खाली उतरू लागले आणि उजवीकडे वळले. निवृत्त एअरलाइन कॅप्टन स्टीव्हन अरोयो यांनी या घटनेचे वर्णन अत्यंत असामान्य असे केले आणि विमानात गंभीर समस्या असल्याचे सुचवले.
प्रतिक्रिया व्यक्त करा