उत्तर प्रदेशच्या २०२७ च्या विधानसभा निवडणुकीची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला पुन्हा यश मिळाले, तर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी कोणाकडे जाईल, यावरूनही राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत.
सध्या योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळाल्यास ते पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी या प्रश्नावर दिलेल्या उत्तरामुळे वेगळीच चर्चा रंगली आहे.
मौर्य नेमके काय म्हणाले?
एका मुलाखतीत मौर्य यांना विचारण्यात आले की, २०२७ मध्ये सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन झाल्यास मुख्यमंत्री कोण होणार? योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री होतील का, की दुसऱ्या कोणाला संधी मिळेल? यावर मौर्य म्हणाले की, मुख्यमंत्री कोणीही होऊ शकतो. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय विधिमंडळ पक्ष, केंद्रीय नेतृत्व आणि संसदीय मंडळाकडून घेतला जातो, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्रीपद हे विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत ठरते आणि त्याबाबतचा अंतिम निर्णय केंद्रीय नेतृत्व घेते, असेही मौर्य यांनी नमूद केले.
योगी यांच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया
अलीकडेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, हे सर्वांना माहिती असल्याचे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्याबद्दल मौर्य यांना विचारले असता, ते म्हणाले की योगी हे सध्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी असे बोलणे स्वाभाविक आहे.
मौर्य यांनी योगी पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे ठामपणे सांगितले नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून पक्षांतर्गत सुप्त स्पर्धा असल्याचे संकेत मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय कोण घेईल, याबाबत मौर्य यांनी विधिमंडळ पक्ष आणि केंद्रीय नेतृत्वाकडे बोट दाखवले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा