डोळे मिटले की सगळं अंधारात बुडतं, असं आपल्याला वाटतं. पण अनेकांना डोळे बंद केल्यानंतरही लाल, निळे, पिवळे किंवा जांभळे रंग दिसतात. कधी चमकणारे तारे, प्रकाशाचे ठिपके किंवा विचित्र आकार डोळ्यांसमोर तरळतात. समोर कोणताही प्रकाश नसतानाही हे सगळं का दिसतं, यामागचं विज्ञान समजून घेऊ.
पापण्यांमधूनही प्रकाश आत येतो
डोळे बंद केले की बाहेरचा प्रकाश पूर्णपणे थांबतो, असा आपला समज असतो. प्रत्यक्षात पापण्या प्रकाशाला गाळण्याचं काम करतात. त्यामुळे काही प्रमाणात प्रकाश, विशेषतः लालसर प्रकाश, पापण्यांमधून डोळ्यांच्या आत पोहोचू शकतो. कडक उन्हात डोळे बंद केले तरी लालसर किंवा पिवळसर प्रकाश जाणवण्याचं कारण हेच आहे.
डोळ्यांच्या मागच्या बाजूला असलेली रेटिना ही प्रकाश ओळखणारी अतिशय संवेदनशील पातळ रचना आहे. तिच्यातील फोटोरिसेप्टर पेशी प्रकाशाचं रूपांतर विद्युत सिग्नलमध्ये करतात. बाहेरून प्रकाश मिळत नसतानाही रेटिनामध्ये काही नैसर्गिक विद्युत हालचाली सुरू असतात. मेंदू या सिग्नलचा अर्थ लावताना आपल्याला प्रकाश किंवा रंग दिसल्याचा अनुभव देऊ शकतो.
फॉस्फीन म्हणजे काय?
डोळ्यांसमोर कोणताही प्रकाश नसताना चमक, रंग किंवा प्रकाशाचे ठिपके दिसण्याच्या अनुभवाला विज्ञानात फॉस्फीन म्हणतात. यामध्ये चमकणारे तारे, रंगीत गोल, लहरी किंवा वेगवेगळ्या भौमितिक आकृत्या दिसू शकतात. यामागे डोळ्यांच्या रेटिना आणि मेंदूमधील नैसर्गिक विद्युत हालचाली कारणीभूत असू शकतात.
डोळे बंद करून त्यावर हलकासा दाब दिला, तर अनेकदा डोळ्यांसमोर चमकणारे तारे किंवा रंगीत ठिपके दिसतात. दाबामुळे रेटिनामधील पेशी उत्तेजित होतात आणि त्यातून निर्माण होणारे विद्युत सिग्नल मेंदूला प्रकाशाच्या स्वरूपात जाणवतात. आपण जे काही पाहतो, त्यामागे मेंदूतील व्हिज्युअल कॉर्टेक्स हा महत्त्वाचा भाग काम करत असतो. डोळे बंद केल्यानंतरही मेंदूचा हा भाग पूर्णपणे निष्क्रिय होत नाही. बाहेरून दृश्य माहिती मिळत नसतानाही न्यूरॉन्सची हालचाल सुरू राहते. याच अंतर्गत हालचालींमुळे कधी रंग, प्रकाश आणि वेगवेगळे आकार दिसू शकतात.
२०१७ मधील संशोधनांमधूनही डोळे बंद असताना मेंदूतील व्हिज्युअल सिस्टीम सक्रिय असल्याचे संकेत मिळाले आहेत. पापण्यांमधून येणारा प्रकाश, रेटिनाची नैसर्गिक क्रिया आणि मेंदूतील न्यूरॉन्सची हालचाल या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे बंद डोळ्यांसमोर दिसणारे रंग आणि प्रकाश.
प्रतिक्रिया व्यक्त करा