हिवाळ्यात केवळ त्वचेवरच नाही, तर केसांवरही हवामानाचा परिणाम होतो. थंडीमुळे केस कोरडे, निस्तेज आणि निर्जीव दिसू लागतात. अशा वेळी केसांचा मऊपणा आणि चमक टिकवण्यासाठी अनेक जण पार्लरमध्ये जाऊन महागडे हेअर स्पा किंवा केराटिन ट्रीटमेंट करून घेतात. मात्र, यासाठी जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणाऱ्या भेंडीच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी हेअर मास्क तयार करू शकता.
भेंडीच्या जेलमुळे केसांचा कोरडेपणा कमी होण्यास आणि केस मऊ, चमकदार बनण्यास मदत होऊ शकते. हा हेअर मास्क बनवण्याची आणि वापरण्याची पद्धत जाणून घेऊया.
भेंडीच्या जेलपासून हेअर मास्क कसा बनवायचा?
सर्वप्रथम १० ताज्या भेंड्या स्वच्छ धुऊन त्यांचे लहान तुकडे करून घ्या. एका भांड्यात एक कप पाणी घेऊन त्यामध्ये भेंडीचे तुकडे टाका. हे मिश्रण मंद आचेवर उकळू द्या. पाणी घट्ट आणि चिकट जेलसारखे दिसू लागल्यानंतर गॅस बंद करा. मिश्रण थंड झाल्यावर गाळणीच्या मदतीने भेंडीचे जेल वेगळे करून घ्या. तयार झालेल्या जेलमध्ये एक चमचा एलोवेरा जेल किंवा बदामाचे तेल मिसळा. अशा प्रकारे तुमचा होममेड हेअर मास्क तयार होईल.
तयार केलेला मास्क केसांच्या मुळांपासून ते संपूर्ण लांबीपर्यंत व्यवस्थित लावा. हा मास्क केसांवर किमान ४० मिनिटे राहू द्या. त्यानंतर माइल्ड शॅम्पूने केस स्वच्छ धुवा. शॅम्पू केल्यानंतर केसांना थोडे कंडिशनरही लावू शकता.
मास्क वापरताना कोणती काळजी घ्यावी?
भेंडीच्या जेलमुळे केसांचा रुक्षपणा कमी होण्यास आणि केस मऊ व सिल्की बनण्यास मदत होऊ शकते. यामुळे केसांना नैसर्गिक चमक मिळण्यासही मदत होते. तसेच केस अधिक मॅनेजेबल होतात आणि ते विंचरणे सोपे जाते. महागड्या हेअर ट्रीटमेंटऐवजी घरच्या घरी हा मास्क तयार करून केसांची निगा राखता येते.
हा मास्क केसांना किंवा टाळूला लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करून पाहा. त्यामुळे जळजळ किंवा खाज यांसारखी समस्या होत नाही ना, हे समजेल. पहिल्यांदा हा मास्क वापरत असाल, तर तो ४० ते ५० मिनिटांपेक्षा जास्त वेळ केसांवर ठेवू नका. तसेच आठवड्यातून फक्त एकदाच या मास्कचा वापर करा.
प्रतिक्रिया व्यक्त करा