कॅरिबियन समुद्रातील एक छोटासा बेटदेश सौंदर्यस्पर्धांच्या जगात मात्र मोठं नाव कमावून बसला आहे. प्यूर्टो रिको या देशाची लोकसंख्या फक्त ३२ लाखांच्या आसपास आहे, तरीही या देशाने आतापर्यंत मिस युनिव्हर्सचे सहा मुकुट पटकावले आहेत. सर्वाधिक विजेतेपदं मिळवणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका आणि व्हेनेझुएलानंतर प्यूर्टो रिको तिसऱ्या क्रमांकावर आहे. एवढ्या कमी लोकसंख्येच्या देशाला हे यश कसं मिळालं, यामागे काही ठोस कारणं आहेत.
निवड प्रक्रियेपासूनच काटेकोर तयारी
प्यूर्टो रिकोमध्ये मिस युनिव्हर्ससाठी स्पर्धकांची निवड अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने होते. राष्ट्रीय स्पर्धेत देशातील वेगवेगळ्या शहरं आणि गावांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या तरुणी सहभागी होतात. अनेक फेऱ्यांमधून त्यांची तयारी आणि क्षमता तपासली जाते, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचेपर्यंत स्पर्धकांचा चांगला सराव झालेला असतो. तिथे सौंदर्यस्पर्धांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळते. राष्ट्रीय निवड प्रक्रियेचं प्रसारण वापा-टीव्ही आणि टेलीमुंडोसारख्या मोठ्या वाहिन्यांवर केलं जातं, त्यामुळे स्पर्धकांना सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा पाठिंबा आणि आत्मविश्वास मिळतो.
भाषा आणि आयोजनाचा अनुभवही जमेची बाजू
प्यूर्टो रिको हा अमेरिकेचा प्रदेश असल्याने तिथल्या नागरिकांना अमेरिकन नागरिकत्व आहे. स्पॅनिशसोबतच इंग्रजी भाषेवर असलेलं प्रभुत्व स्पर्धकांसाठी मोठा फायदा ठरतं, कारण मिस युनिव्हर्समधील मुलाखती आणि प्रश्नोत्तरांच्या फेऱ्यांमध्ये संवाद कौशल्य महत्त्वाचं असतं. या देशाने १९७२, २००१ आणि २००२ मध्ये मिस युनिव्हर्स स्पर्धेचं आयोजनही केलं आहे. २००१ मध्ये डेनिस किनोनेसने मायदेशातच मुकुट जिंकला होता. बदलत्या काळानुसार २०२३ पासून विवाहित महिला आणि मातांनाही या स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी मिळाली आहे, त्यामुळे या मंचावर संधींची नवी दारं खुली झाली आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा