खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नांदूर मधमेश्वर कालव्यातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले आहे. शुक्रवारी, २० नोव्हेंबर रोजी रात्री सुरुवातीला ३०० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला. या आवर्तनातून मिळणाऱ्या सुमारे दीड टीएमसी पाण्यामुळे तीन तालुक्यांतील १०२ गावांमधील ४३ हजार ५६० हेक्टर क्षेत्रावरील पिकांना मोठा आधार मिळणार आहे.
तीन तालुक्यांतील १०२ गावांना लाभ
धरणात आवश्यक पाणीपातळी उपलब्ध होताच हे आवर्तन सोडण्यात आले. यामध्ये वैजापूर तालुक्यातील ४९, गंगापूर तालुक्यातील ४६ आणि कोपरगाव तालुक्यातील ७ गावांचा समावेश आहे. सुमारे १२० किलोमीटर लांबीच्या कालव्यावर ४९ पोटचाऱ्यांद्वारे पाणीवाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे रब्बी पिकांसह भूजल पुनर्भरणालाही मदत होणार आहे.
हे आवर्तन तीन आठवडे सुरू राहणार आहे. टप्प्याटप्प्याने हा विसर्ग ८५० क्युसेकपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची माहिती नांदूर मधमेश्वर कालवा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाबळे यांनी दिली. नियोजित पाणीपातळीनुसार कालव्यात पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून रविवारी सकाळी कालव्याचे पाणी वैजापूर तालुक्याच्या हद्दीत दाखल होणार आहे.
टेल टू हेड पद्धतीने वाटप
पाणीवाटप ‘टेल टू हेड’ पद्धतीने होणार असून प्रथम गंगापूर, नंतर वैजापूर आणि शेवटी कोपरगाव तालुक्याला पाणी मिळेल. अनधिकृत उपसा, कालव्याच्या गेटमध्ये हस्तक्षेप व वाद टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अपर जिल्हादंडाधिकारी जनार्दन विधाते यांनी ११ जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले असून, पाणीवाटपात अडथळा आणणाऱ्यांवर थेट कारवाईचा इशारा दिला आहे.
दरम्यान, सोयगाव तालुक्यात मात्र वेगळे चित्र आहे. तालुक्यातील ८७ गावांमधून अद्याप एकाही टँकरची मागणी न आल्याने सद्यःस्थितीत सोयगाव तालुका कागदोपत्री टँकरमुक्त आहे. मात्र, २१ धरणांतील पाणीसाठा वेगाने खालावत असल्याने आगामी काळात टंचाईचे संकट ओढवण्याची दाट शक्यता आहे. यंदा पावसाळ्यातील तीन महिने कोरडे गेले असून केवळ जुलैत अल्प पाऊस झाला. बंधाऱ्यांतील पाणी वाहून गेल्याने तालुक्यातील २९ गावांमधून वाहणाऱ्या नद्या आणि पाझर तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत. तालुक्यात ८७ गावे व ४८ ग्रामपंचायती असून शहरासह एकूण लोकसंख्या सुमारे दीड लाख आहे. बनोटी व सावळदबारा परिसर पर्जन्यछायेत येत असल्याने तेथे दरवर्षी टंचाई भासते. यंदा सर्वच जलस्रोतांनी तळ गाठल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीकडून सध्या टँकर मागणीचा प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे सध्या एकही टँकर सुरू नसला, तरी संभाव्य टंचाई लक्षात घेऊन ग्रामसेवकांना उपाययोजनांच्या सूचना दिल्या आहेत. परिस्थितीवर बारीक लक्ष असल्याचे गटविकास अधिकारी शिवाजी यमुलवाड यांनी सांगितले.
Leave a Reply