बंगालच्या खाडीत अकवान चक्रीवादळ धडकले आहे. या चक्रीवादळाचा फटका अनेक राज्यांत बघायला मिळत आहे. ओडिसात या चक्रीवादळाने धुमाकूळ घातला असून आता त्याचा फटका भंडारा जिल्ह्यातही बघायला मिळत आहे. बदलत्या हवामानाने शेतकरी चिंतेत आहेत. भंडारा जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तूर आणि धान पिकांवर संक्रांत
सध्या जिल्ह्यात तूर पीक फुलोरा अवस्थेत आहे. मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस सुरू आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे तुरीची फुले गळणे, शेंगा लागण्याचे प्रमाण कमी होणे आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. दुसरीकडे, अनेक भागांत धान पीक कापणीला आले असून काही शेतकऱ्यांनी कापलेले धान वाळवण्यासाठी ठेवले आहे. संभाव्य मुसळधार पावसामुळे या पिकांचेही नुकसान होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे मागणी
यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पावसाची कमतरता आणि दुष्काळी परिस्थिती आधीच जाणवत आहे. त्यात उत्पादन खर्च आणि वाढत्या मजुरीचा भार असताना आता हवामानाच्या बदलत्या स्थितीमुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. राज्यात एकीकडे दुष्काळाचे मोठे संकट आहे, तर दुसरीकडे थोड्याफार प्रमाणात आलेले धान्यही शेतकऱ्यांच्या हातातून निघून जाताना दिसत आहे. सरकारने काही दिवसांपूर्वीच राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे कृषी विभागाने तातडीने योग्य उपाययोजना करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.
Leave a Reply