जळगाव महापालिकेच्या रविवारी झालेल्या विशेष महासभेत एका वादग्रस्त विधानावरून जोरदार गोंधळ निर्माण झाला. शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी केलेल्या विधानावरून सभागृहात वाद झाला आणि अखेर महापौर दीपमाला काळे यांनी दोन नगरसेवकांना सभागृहाबाहेर जाण्याचे आदेश दिले.
महासभेत शहरातील विविध विकासकामांवर चर्चा सुरू होती. त्याचवेळी मूळ आणि वाढीव हद्दीच्या सुधारित प्रारूप विकास आराखड्याला प्रसिद्धी देण्याचा विषय चर्चेला आला. पटेल आपली बाजू मांडत होते. प्रभागातील नागरिक कामांसाठी आपल्याकडे येतात, मात्र आपण सत्ताधारी पक्षाचे सदस्य नसून गरीब नगरसेवक असल्याने आपल्या कामांना प्राधान्य दिले जात नाही, असे त्यांनी सांगितले. याचवेळी त्यांनी ‘गरीब की बीवी सबकी भाभी होती है’ असे वादग्रस्त विधान केले.
सभागृहात शाब्दिक चकमक
या विधानावरून भाजपचे नगरसेवक विजय बांदल आणि शरद तायडे यांच्यासह पटेल यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. जळगाव महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने ठाकरे गटाच्या नगरसेवकांना डावलले जात असल्याचा आरोपही पटेल यांनी केला. त्यानंतर झालेल्या वादावादीमुळे आणि घोषणाबाजीमुळे महासभेत काही काळ प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
महापौरांची कारवाई
सभागृहाची प्रतिष्ठा मलिन करणाऱ्या या घटनेची महापौर दीपमाला काळे यांनी गंभीर दखल घेतली. आक्षेपार्ह वक्तव्य करणारे इब्राहिम पटेल आणि अंगावर धावून जाणारे विजय बांदल या दोन्ही नगरसेवकांना महापौरांनी दहा मिनिटांसाठी सभागृहाच्या बाहेर जाण्याचे आदेश दिले. दोन्ही नगरसेवक बाहेर गेल्यानंतर महासभेचे कामकाज पुन्हा सुरळीत सुरू झाले.
महासभेत झालेला हा वाद केवळ सभागृहापुरता मर्यादित राहिला नाही. सभागृहातून बाहेर पडल्यानंतरही त्याचे पडसाद उमटले. महापालिकेच्या कार्यालयातही भाजप आणि ठाकरे गटाच्या नगरसेवकांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद झाल्याचे पाहायला मिळाले.
Leave a Reply