गुजरातमधील पारुल विद्यापीठात सुरू असलेल्या ४५व्या ज्युनिअर राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या संघांनी विजयी सुरुवात केली आहे. साखळी सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रतिस्पर्ध्यांना एकतर्फी पराभूत करत स्पर्धेतील आपली ताकद दाखवून दिली.
मुलींच्या संघाने आंध्र प्रदेशचा ३०-१२ असा, तर मुलांच्या संघाने हिमाचल प्रदेशचा ३८-१८ असा पराभव केला. दोन्ही विजय एक डाव राखून मिळवण्यात आले. या दोन्ही सामन्यांमधून महाराष्ट्राच्या संघांनी स्पर्धेत जोरदार सुरुवात केली आहे.
श्वेता नवलेची निर्णायक कामगिरी
मुलींच्या अ गटातील सामन्यात महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षणाचा निर्णय घेतला. सुरुवातीपासूनच खेळावर वर्चस्व गाजवत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आक्रमण आणि संरक्षण या दोन्ही आघाड्यांवर प्रभावी खेळ केला. प्रतिस्पर्ध्याला वरचढ होण्याची संधीच देण्यात आली नाही.
या विजयात श्वेता नवलेने १ मिनिट ३० सेकंद नाबाद संरक्षणासह १० गुण मिळवत निर्णायक भूमिका बजावली. धनश्री कंकने ३ मिनिटे १० सेकंद संरक्षण करत चार गुण, तर मैथिली पवारने तेवढेच संरक्षण करत दोन गुण मिळवले. वेदिका तामखडेने २ मिनिटे २० सेकंद संरक्षण केले. स्नेहा लामकानेने चार गुण, तर नंदिनी सिसोदियाने दोन गुण मिळवत संघाच्या विजयात भर घातली. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी संरक्षणात आठ बोनस गुणही मिळवले. आंध्र प्रदेशकडून एम. डी. लक्ष्मी, एम. वाय. श्री, नेक्कलापुडी आणि ताडिथला प्रिया यांनी प्रत्येकी दोन गुण मिळवले, मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले.
ताबरेज खानचे १० गुण
मुलांच्या ब गटातील सामन्यात महाराष्ट्राने हिमाचल प्रदेशवर ३८-१८ असा विजय मिळवला. महाराष्ट्राकडून ताबरेज खानने सर्वाधिक १० गुण मिळवत आक्रमणात धडाका उडवला. हरदाय वसावेने २ मिनिटे ३० सेकंद संरक्षण करत सहा गुण, तर जितेंद्र वसावेने चार गुण मिळवले. पार्थ देवकतेने दोन गुण, तर समर्थ चव्हाणने एक मिनिट संरक्षण करत संघाला साथ दिली. हिमाचल प्रदेशकडून राजीव ठाकूर आणि अरक्षित शर्मा यांनी प्रत्येकी सहा गुण, तर नमन धिमानने दोन गुण मिळवले. मात्र महाराष्ट्राच्या आक्रमक खेळासमोर त्यांचा प्रतिकार टिकू शकला नाही.
Leave a Reply