बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्प परिसरात शेतकऱ्यांच्या मोटारी बंद करण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. प्रकल्पाचे शाखा अभियंता राजगुरू आणि ठाणेदार रूपेश शक्करगे शुक्रवारी मोटारी बंद करण्यासाठी गेले असता, शेतकऱ्यांनी एकजुटीने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. त्यानंतर अधिकाऱ्यांना चर्चेचा मार्ग स्वीकारावा लागला.
अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा आणि अन्यायाची भावना परखडपणे मांडली. ज्या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी आणि घरे दिली, त्याच प्रकल्पाच्या पाण्यावर शेती करण्याची वेळ आली असताना सर्वप्रथम प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्याच मोटारी बंद करण्याचा अट्टाहास का, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
आधी बोटी बंद करा, रेती उपसा थांबवा
शेतकऱ्यांनी ठाम भूमिका मांडली की, आधी धरणातील बोटी बंद कराव्यात, रेतीचा अवैध उपसा थांबवावा आणि ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी धरणात गेलेल्या नाहीत, त्यांच्या मोटारी अगोदर बंद कराव्यात. त्यानंतरच प्रकल्पग्रस्तांच्या मोटारींबाबत चर्चा करावी, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रकल्पग्रस्तांच्या मोटारींना हात लावण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला की, आमच्या मोटारी बंद करण्यासाठी प्रशासन तत्परता दाखवते, मग धरणातील बोटी बंद करण्यासाठी अशीच तत्परता का दाखवली जात नाही? अवैध रेती उपशामुळे धरणातील पाण्याची पातळी कमी होत असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे का, आणि या व्यवहारात कोणाचे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत का, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.
काढणीपर्यंत मोटारी सुरू ठेवण्याची मागणी
शेतकऱ्यांनी आणखी एक महत्त्वाची मागणी मांडली. जर धरणातील रेती उपसा आणि बोटींची वाहतूक तातडीने बंद करणे शक्य नसेल, तर किमान ऊस, अद्रक आणि हळद या पिकांची काढणी पूर्ण होईपर्यंत म्हणजेच पुढील एक महिना तरी मोटारी सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, असे त्यांनी सांगितले. ही पिके महत्त्वाच्या टप्प्यावर असून पाणी बंद केल्यास मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, ठाणेदार शक्करगे यांनी कायदेशीर कारवाई आणि गुन्हे दाखल करण्याबाबत भूमिका मांडली. कोणताही निर्णय न घेता वरिष्ठांशी चर्चा करून पुढील निर्णय कळविण्यात येईल, असे सांगून अधिकाऱ्यांना परतावे लागले. या बैठकीला युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर, मंडपगावचे सरपंच सचिन कदम, चिंचखेडचे सरपंच रामेश्वर वायाळ यांच्यासह इसरूळ, चिंचखेड आणि मंडपगाव परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply