वाहन क्षेत्रात नवनवीन प्रयोगांसाठी ओळखल्या जाणाऱ्या एलॉन मस्क यांनी आता एक वेगळीच कल्पना मांडली आहे. त्यांच्या टेस्ला कंपनीकडून अशी कार तयार करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यामध्ये स्टिअरिंग, क्लच आणि ब्रेक यापैकी काहीही नसेल. ही कार पूर्णपणे तंत्रज्ञानावर चालणारी असेल, असे सांगितले जात आहे.
मस्क हे टेस्लाचे प्रमुख आहेत. त्यांनी यापूर्वी अवकाश संशोधन क्षेत्रातही मोठे काम केले आहे. त्यांच्या स्पेसएक्स कंपनीने या क्षेत्रात अनेक नवे विक्रम नोंदवले आहेत. त्याचप्रमाणे वाहन निर्मितीतही ते काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.
मॉडेल वायच्या नव्या आवृत्तीत ही रचना येणार?
टेस्ला कारच्या वाय आणि वाय एल या मॉडेलच्या नव्या आवृत्त्या तयार करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या नव्या आवृत्त्यांमध्ये स्टिअरिंग नसेल. त्यासोबतच कारमध्ये क्लच आणि ब्रेकही नसेल, अशी माहिती देण्यात आली आहे. ही कार पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने चालेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
भविष्यात ही कार सर्वसामान्य लोकांना चालवण्यासाठी विकलीही जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय कंपनीकडून अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.
किंमत आणि वेळापत्रक अद्याप स्पष्ट नाही
मस्क यांनी स्वतः न्यूयॉर्क टाईम्सच्या डीलबुक समिटमध्ये या योजनेची माहिती दिली आहे. मात्र अशा कारची किंमत किती असेल, ती कधी बाजारात येईल आणि तिच्या निर्मितीचा खर्च किती असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे ही कार नेमकी कशी असेल आणि ती कधी उपलब्ध होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply