पुण्यात एका वेगळ्याच क्लबची सुरुवात झाली आहे. त्याचे नाव आहे कॉकरोच क्लब. नाव ऐकताच हा एखादा नाइटक्लब किंवा खाण्यापिण्याचे ठिकाण असावा, असा अंदाज बांधला जाऊ शकतो. मात्र प्रत्यक्षात हा क्लब मनोरंजनासोबतच सामाजिक आणि राजकीय विषयांवर चर्चा करण्यासाठी उभारण्यात आला आहे. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर देशातील पहिल्या जनरेशन झी आंदोलनाचे नेतृत्व केल्याचा दावा करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीने या क्लबची सुरुवात केली आहे. पुण्यात २१ नोव्हेंबर २०२६ रोजी या क्लबचा पहिला कार्यक्रम पार पडला.
क्लबची संकल्पना काय आहे?
कॉकरोच जनता पार्टीने सुरू केलेला हा क्लब म्हणजे केवळ मनोरंजनाचे ठिकाण नाही. कॉमेडी, व्यंग आणि वैचारिक चर्चांच्या माध्यमातून तरुणांपर्यंत सामाजिक आणि राजकीय विषय पोहोचवणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. लिगेसी ऑफ बापू ही थीम घेऊन या क्लबची सुरुवात करण्यात आली आहे. महात्मा गांधी यांचे विचार, त्यांचे तत्त्वज्ञान आणि सामाजिक-राजकीय मुद्दे पारंपरिक आंदोलनांऐवजी मनोरंजन आणि संवादाच्या माध्यमातून तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न यामागे आहे.
पहिल्या कार्यक्रमात काय झाले?
कॉकरोच क्लबचा पहिला अधिकृत कार्यक्रम २१ नोव्हेंबर रोजी पुण्यात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते. यावेळी स्टँडअप कॉमेडियन मराठी कपिल यांच्यासह अनेक कलाकारांनी सादरीकरण केले. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला होता. मात्र उपस्थित राहण्यासाठी ऑनलाइन नोंदणी आणि अधिकृत पास आवश्यक होता. या कार्यक्रमाला कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्यासह पक्षाचे अनेक सदस्य उपस्थित होते. मात्र पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके या कार्यक्रमात दिसले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, पक्षाचे सहसंयोजक आणि अभिजीत दीपके यांचे निकटवर्तीय असलेल्या आशुतोष रांका यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत कॉकरोच क्लबची सुरुवात झाल्याची माहिती दिली. लवकरच यासंदर्भातील संपूर्ण एपिसोड समोर येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. पुण्यातून सुरू झालेला हा उपक्रम देशातील इतर शहरांमध्येही नेण्याची आयोजकांची योजना आहे.
Leave a Reply