रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उल्हासनगरच्या दौऱ्यावर होते. दौऱ्यादरम्यान रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका दाम्पत्याकडे त्यांचे लक्ष गेले आणि त्यांनी आपला ताफा थांबवला. हे दाम्पत्य एसएमए टाइप १ या दुर्मिळ आणि गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या यशश्री चितळकरचे आई-वडील होते. आपल्या मुलीच्या उपचारासाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे याचना केली. मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलता दाखवत संबंधित अधिकाऱ्यांना चितळकर कुटुंबीयांना सर्वोतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले.
दुर्मिळ आजारावर उपचारासाठी ११ कोटींची गरज
यशश्रीला एसएमए टाइप १ हा दुर्मिळ आजार झाला आहे. तिच्या उपचारासाठी तब्बल ११ कोटी रुपयांची गरज आहे. आपल्या लेकीला वाचवण्यासाठी तिचे आई-वडील संघर्ष करत आहेत. मदतीसाठी त्यांनी ट्रस्ट आणि मंदिरांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. दानशूर व्यक्तींकडेही ते मदतीची याचना करत आहेत. काहीही करून आपल्या लेकीला या आजारातून बरं करायचं, असा त्यांनी निश्चय केला आहे. दिवस-रात्र ते आर्थिक मदतीसाठी तहान-भूक विसरून धडपड करत आहेत.
त्यांच्या प्रयत्नांना यश येत आहे, पण आतापर्यंत मदत मोहिमेत दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून फक्त ५१ लाख रुपयेच जमा झाले आहेत. म्हणजेच अद्याप त्यांना साडेदहा कोटी रुपयांची गरज आहे. ती रक्कम खूप मोठी वाटत असली तरी देव काही तरी मार्ग काढेल, या आशेने त्यांनी आपले प्रयत्न सोडलेले नाहीत.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीने मदतीची आशा
मुख्यमंत्री उल्हासनगरला येणार असल्याचे कळताच यशश्रीच्या आई-वडिलांनी सकाळपासूनच रखरखत्या उन्हात आपल्या लेकीसह त्यांची वाट पाहिली. मुख्यमंत्र्यांनी सहानुभूती दाखवत आपला ताफा थांबवला आणि त्यांच्याकडून यशश्रीच्या आजाराबाबत माहिती जाणून घेतली. त्या काही मिनिटांमध्ये यशश्रीच्या आई-वडिलांनी मुख्यमंत्र्यांना आपल्याजवळील कागदपत्रांसमवेत आवश्यक असलेली मदत आणि सद्य परिस्थिती मांडली. मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती जाणून घेत तातडीने यशश्रीच्या उपचारासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः ताफा थांबवून या कुटुंबाची भेट घेतल्याने यशश्रीच्या उपचारासाठी मदतीची आशा निर्माण झाली आहे.
Leave a Reply