दिवाळीनंतर कसमादेत शेती कामांना वेग आला आहे. शेतातील मका आणि बाजरीची कापणी व काढणीचे काम सुरू आहे. काही ठिकाणी कांदा लागवड केली जात आहे. दिवाळीमुळे शेतमजुरांनी सुट्टी घेतल्याने आठवडाभर शेती कामे जवळपास बंद होती. पुरेशा पावसाअभावी मक्याचे उत्पन्न अल्प प्रमाणात आले आहे. करपलेल्या मक्याचा चारा शेतकरी गोळा करीत आहेत.
शेतातील मका आणि बाजरीची कापणी, कणीस खुडणे आणि मळणी करणे ही कामे केली जात आहेत. पाणी असलेल्या भागात लाल कांद्याची लागवड होत आहे. आगाऊ लागवड केलेला लाल कांदा काढणीला आला आहे. मक्याला सरासरी अडीच हजार ते दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल दरम्यान भाव मिळत आहे. मका कापणीनंतर काही शेतकरी उपलब्ध पाण्याचा हिशेब करून पुढील पिकासाठी शेतीच्या मशागतीच्या तयारीला लागले आहेत.
मजूरटंचाईचा प्रश्न कायम
कसमादेत पुरेशा प्रमाणात शेतमजूर उपलब्ध होत नाहीत. मजुरटंचाईचा प्रश्न कायम आहे. मका आणि बाजरीची कापणी रोजंदारीवर करण्यास मजूर धजावत नाहीत, त्यामुळे मक्ता पद्धतीने ही कामे केली जात आहेत. कमी क्षेत्र असलेले शेतकरी स्वतःच ही कामे करीत आहेत. मजुरांअभावी काही ठिकाणी मका कापणी बाकी आहे.
अपुऱ्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. पुरेसे उत्पन्न न आल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे मका पिकाला कणसे आली नसून चारा गोळा करावा लागत आहे. मका पीक वाया गेल्याने गहू आणि लाल कांद्याची लागवड सुरू आहे. मजुरांअभावी कामे लांबली असून दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडले असल्याची भावना टेहरे येथील शेतकरी राजेंद्र शेवाळे यांनी व्यक्त केली आहे.
Leave a Reply