सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

टोमॅटोला कवडीमोल भाव; बावड्यातील उत्पादक मेटाकुटीला

इतर फळभाज्यांना चांगला भाव मिळत असताना टोमॅटोला मात्र प्रतिकिलो आठ ते दहा रुपयेच भाव मिळत आहे. खर्चही निघत नसल्याने बावड्यातील उत्पादक मेटाकुटीला आले आहेत.

टोमॅटोला कवडीमोल भाव; बावड्यातील उत्पादक मेटाकुटीला

नीरा नरसिंहपूर परिसरात सध्या सर्वच फळभाज्यांना चांगला बाजारभाव मिळत आहे. मात्र टोमॅटोला मात्र कवडीमोल भाव मिळत आहे. सध्या प्रतिकिलो आठ ते दहा रुपये भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चासह वाहतूक खर्च निघणेही अवघड झाले आहे. त्यामुळे बावडा परिसरातील उत्पादक मेटाकुटीला आले आहेत.

तरकारी घाऊक बाजारात पुणे जिल्ह्यासह सोलापूर आणि सांगली या भागातून आवक होत आहे. पुण्यातील मार्केटयार्डात सरासरी सात ते आठ हजार क्रेट आवक होत आहे. येथील बाजारातून राज्यातील इतर बाजारांत आणि परराज्यांत टोमॅटो जात असतो.

आवक जास्त, उठाव कमी

विविध जिल्ह्यांसह परराज्यातही यंदा टोमॅटोचे पीक चांगले आले आहे. त्यामुळे आवकेच्या तुलनेत मालाला उठाव कमी आहे. परिणामी टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली आहे. वातावरणातील बदलामुळे बाजारात प्रचंड आवक होत असून बाजारात मंदी निर्माण झाली असल्याचे व्यापारी फिरोज बागवान यांनी सांगितले.

भाव कमी झाल्याने हॉटेल व्यावसायिक आणि खानावळीवाल्यांकडून टोमॅटोची खरेदी अधिक प्रमाणात करण्यात येत आहे. घरगुती ग्राहकांकडून मात्र नेहमीच्या प्रमाणातच मागणी असल्याचे ज्येष्ठ आडतदार समीर बागवान यांनी सांगितले. सद्यस्थितीत मार्केटयार्डात टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. आणखी काही दिवस हीच स्थिती राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

बागच सोडून दिली

बावडा येथील नरसिंहपूर मार्गालगत फिरोज अत्तार यांची टोमॅटोची बाग बाजारभाव पडल्याने सोडून देण्यात आली आहे. राज्यासह परराज्यात एकाच वेळी टोमॅटो काढणीला आल्याने आवकेच्या तुलनेत मालाला उठाव कमी आहे. परिणामी कवडीमोल भाव मिळत आहे. पुढील काही दिवस हीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे बाग सोडून दिल्याचे शेतकरी फिरोज अत्तार यांनी सांगितले.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance