मालेगाव तालुक्यातील चिखलओहोळ येथील महाजन वस्ती ते जळकू शिवार या दोन किलोमीटरच्या पाणंद रस्त्याचे काम अजूनही शासकीय फायलींमध्येच अडकले आहे. या रस्त्यासाठी वरिष्ठ पातळीवरून आठ वेळा कार्यवाहीचे आदेश देऊनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
या पाणंद रस्त्याचा वापर परिसरातील जवळपास तीनशे शेतकरी आणि ग्रामस्थ करतात. विद्यार्थीही याच रस्त्याने ये-जा करतात. परिसरातील शेतीचे पाणी पाणंद रस्त्यावर येत असल्याने येथे कायम चिखल असतो. पावसाळ्यात या रस्त्यावर गुडघाभर चिखल साचतो आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. त्यामुळे शेतकऱ्यांना चिखलातून वाट काढावी लागते.
आठ वेळा आदेश, तरीही दखल नाही
या रस्त्यासाठी ग्रामपंचायतीने ३० जून २०२५ रोजी ठराव करून ग्रामस्थांची लेखी संमती घेतली आहे. रस्त्याची मोजणी आणि मंजुरी व्हावी यासाठी तरुण शेतकरी रुद्र मुरलीधर खैरनार यांनी गेल्या दीड वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यांच्या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्री कार्यालय, महसूल मंत्रालय, नाशिक विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांनी मालेगाव प्रशासनाला कार्यवाहीचे आदेश दिले. मात्र मालेगाव तालुका भूमी अभिलेख कार्यालयाकडून अद्याप दखल घेतली गेली नाही, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
मालेगाव पंचायत समितीने २२ मे २०२६ च्या पत्राद्वारे उपअधीक्षक भूमी अभिलेख, मालेगाव यांच्याकडे गट क्रमांक २०८ ते २३९ चे सीमांकन करण्याचा रीतसर प्रस्ताव पाठवला होता. तरीही कोणतीही कारवाई झाली नाही.
२६ जानेवारीला आंदोलनाचा इशारा
वरिष्ठांच्या आदेशांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, रस्त्याची तत्काळ मोजणी करावी आणि रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे, अशी मागणी रुद्र खैरनार, गणेश खैरनार, अविनाश खैरनार, देवेंद्र खैरनार, हेमंत खैरनार यांच्यासह ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.
मोजणी तत्काळ न झाल्यास २६ जानेवारीला ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
Leave a Reply