पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त जवाहर बाल मंचतर्फे वाशी येथील मराठी साहित्य मंदिरात राष्ट्रीय बालदिन सोहळा पार पडला. बालकांमध्ये एकता, सहकार्य, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास विकसित करण्याच्या उद्देशाने झालेल्या या उपक्रमात ठाणे, कळवा, मुंब्रा आणि नवी मुंबई परिसरातील सुमारे १५० ते १७५ मुला-मुलींनी सहभाग घेतला. दिवसभर चाललेल्या या सोहळ्यात खेळ, संवाद आणि सांघिक उपक्रमांतून मुलांना एकता आणि सहकार्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी खासदार तथा पद्मश्री कुमार केतकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आबा दळवी, जवाहर बाल मंचच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नीला लिमये, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. विहारी, राष्ट्रीय समन्वयक अमन हसन आणि समन्वयक वैशाखा उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन नीला लिमये आणि महाराष्ट्रातील जवाहर बाल मंचच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते.
खेळांतून मूल्यांचे शिक्षण
कार्यक्रमात पंडित नेहरू यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, स्वतंत्र भारताच्या उभारणीतील भूमिका आणि आधुनिक भारताबाबतची दूरदृष्टी यांची माहिती देण्यात आली. त्यानंतर सामूहिक नृत्य, मनोरंजक खेळ आणि सांघिक उपक्रमांतून एकता, सहकार्य आणि सामूहिक निर्णयांचे महत्त्व पटवून देण्यात आले. संविधानातील समता आणि बंधुता या मूल्यांवरही मुलांशी संवाद साधण्यात आला. मुलांचा संकोच दूर करून आत्मविश्वास वाढविण्यासाठी शरीरशिल्पासारखे अभिनव उपक्रम घेण्यात आले. मुलींनीही मोकळेपणाने सहभागी होऊन व्यक्तिमत्त्व विकसित करावे, यावर विशेष भर देण्यात आला. मार्गदर्शन करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी पुस्तकातील विचार प्रत्यक्ष आचरणात आणल्यानेच खरे शिक्षण मिळते, असे सांगितले. तर कुमार केतकर यांनी नेहरूंच्या पत्रलेखनाचा संदर्भ देत त्यांच्या व्यापक विचारसरणी आणि भविष्यवेधी दृष्टिकोनाची माहिती दिली. दिवसभरातील खेळ, संवाद आणि खाऊवाटपामुळे बालकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
Leave a Reply