छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर दररोज मोठ्या संख्येने पर्यटक आणि शिवप्रेमी भेट देतात. मात्र माणगाव तालुक्यातील निजामपूरमार्गे रायगडाकडे जाणाऱ्या पर्यटकांना दिशादर्शक फलकांच्या अभावामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. निजामपूर-बोरवाडी-पाचाड ते किल्ले रायगड या सुमारे २८ किलोमीटरच्या मार्गावर आवश्यक ठिकाणी फलक नसल्याने विशेषतः प्रथमच येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होत आहे.
प्रथमच येणाऱ्या पर्यटकांचा संभ्रम
रायगड किल्ल्याच्या दर्शनासाठी मुंबई, पुणे यांसह विविध भागांतून पर्यटक खासगी वाहनांनी येतात. त्यापैकी अनेक जण निजामपूरमार्गे रायगडाकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर करतात. मात्र मार्गावर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने अनोळखी पर्यटकांना योग्य रस्ता शोधताना संभ्रम निर्माण होतो. काही ठिकाणी असलेले जुने फलकही नादुरुस्त किंवा अस्पष्ट अवस्थेत आहेत.
प्रशासनाकडून फलकांची अपेक्षा
रायगडाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता पर्यटकांना आवश्यक मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. एकीकडे पर्यटनवाढीसाठी प्रयत्न सुरू असताना महत्त्वाच्या मार्गावरील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने निजामपूर ते किल्ले रायगड मार्गाची पाहणी करून आवश्यक ठिकाणी अंतरासह स्पष्ट दिशादर्शक फलक बसवावेत आणि जुन्या फलकांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. यामुळे पर्यटकांचा वेळ वाचून प्रवास अधिक सुलभ होईल. प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घ्यावी, अशी अपेक्षा पर्यटक आणि शिवप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
Leave a Reply