नाशिक जिल्ह्यात दुष्काळामुळे रब्बी हंगामावर थेट परिणाम झाला असून, उन्हाळ कांद्याच्या लागवडीत यंदा ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. उन्हाळ कांद्याचे उत्पन्न घटण्याचा अंदाज असल्याने लाल कांद्याला सध्या सरासरी ४ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. भविष्यातही कांदा तेजीत राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने तब्बल १३ तालुक्यांमध्ये दुष्काळ आहे. दीपावलीच्या सणावरही त्याचा प्रभाव दिसून आला. दीपावलीनंतर गहू, हरभरा आणि उन्हाळी मक्याच्या पेरणीला सुरुवात होते. चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव, येवला व सिन्नर या भागात उन्हाळ कांद्याची लागवड सुरू होते. नोव्हेंबर उजाडला तरी जिल्ह्यात रब्बी पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत. कृषी विभागाने निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ४ टक्केच पेरण्या झाल्याची चिंताजनक नोंद झाली आहे.
चार तालुक्यांत पेरणीचा श्रीगणेशही नाही
जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामासाठी एकूण १ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. मात्र, त्यापैकी दीपावलीपूर्वी प्रत्यक्षात केवळ ४ हजार ६३१ हेक्टरवरच पेरण्या झाल्या. पेठ, कळवण, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या तालुक्यांमध्ये रब्बी पेरण्यांची अजून सुरुवातही झालेली नाही. दिंडोरी तालुक्यात ५.६८ टक्के पेरण्या झाल्या असून, इतर सर्व तालुक्यांमध्ये पेरणीचे प्रमाण पाच टक्क्यांच्या आतच मर्यादित आहे. प्रमुख पीक असलेल्या गव्हासाठी ६४ हजार २३३ हेक्टर क्षेत्र निश्चित असून, आतापर्यंत फक्त १ हजार ६२४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. हरभऱ्याच्या ३३ हजार ३५७ हेक्टरपैकी केवळ १ हजार ५७५ हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. खरीप हंगामात फटका बसलेल्या मक्यासाठी ९ हजार २८४ हेक्टरचे उद्दिष्ट असताना १ हजार ८६ हेक्टरवरच लागवड झाली आहे. ज्वारीच्या ४ हजार २२० हेक्टरपैकी २५९.४० हेक्टरवर पेरणी झाली असून, इतर कडधान्यांची पेरणीही अत्यंत कमी आहे.
कमी पावसामुळे विहिरी आणि धरणांमधील पाणीसाठा आटल्याने पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम कांदा लागवडीवरही झाला आहे. उन्हाळ कांद्याचे जिल्ह्यात २.२५ लाख हेक्टर क्षेत्र आहे. यात साधारणतः ३५ टक्क्यांवर घट झाल्यामुळे लागवडही मंदावलेली दिसते. तालुकानिहाय पेरण्यांची टक्केवारी अशी आहे — बागलाण १.५३, चांदवड २.१५, देवळा २.६६, दिंडोरी ५.६८, इगतपुरी ०.४५, कळवण ०.७३, मालेगाव २.४४, नांदगाव १.८०, नाशिक २.८०, निफाड ३.८२, पेठ शून्य, सिन्नर १०.६७, सुरगाणा १.४२, त्र्यंबकेश्वर ०.०२ आणि येवला ३.०२.
लाल कांद्याची आवक वाढणार
दीपावलीनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समित्यांना सोमवारपर्यंत सुटी देण्यात आली होती. या कालावधीत शेतकऱ्यांनी लाल कांदा शेतातून काढल्याने विक्रीसाठी सोमवारी गर्दी होण्याची शक्यता आहे. लाल कांद्याला सध्या सरासरी ४ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. आवक कमी झाल्यास त्यातही वाढ होऊ शकते.
Leave a Reply