सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा जमाना आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे कल्पनेतील प्रत्येक गोष्ट फोटोंच्या रूपात दाखवता येते. मात्र, उत्तर प्रदेशातील एका तरुणाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून असा फोटो तयार केला की त्याची अख्ख्या गावात एकच चर्चा रंगली. एवढेच नव्हे, तर त्याच्याकडे ढुंकूनही न पाहणारे गावकरी आता आमच्या मुलीशी लग्न करा म्हणत त्याच्या पाठीमागे लागले आहेत.
मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो गावात दाखवला
ही मजेशीर घटना तरुण पंडित नावाच्या एका मुलाची आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तरुणाने या व्हिडिओमध्ये आपली संपूर्ण कहाणी सांगितली आहे. त्याने सांगितले की, त्याने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत स्वतःचा एक फोटो तयार केला. यानंतर तो फोटो थेट ग्रामपंचायतीकडे घेऊन गेला. तिथे उपस्थित असलेल्या वडीलधाऱ्या मंडळींना त्याने स्वतःचा आणि मुख्यमंत्र्यांचा फोटो दाखवताच संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. गावकरी चर्चा करू लागले आणि गावात त्याचे वजनही चांगलेच वाढले.
गावप्रमुख पदाची निवडणूक लढवण्याचे आमंत्रण
तरुणाने सांगितले की, गावात कोणीही विचारत नव्हते, मात्र आता त्याला श्रीमंत घरची स्थळे येऊ लागली आहेत. इतकेच नाही, तर गावकऱ्यांनी त्याला पुढच्या निवडणुकीत गावप्रमुख पदासाठी निवडणूक लढवण्याचे आमंत्रणही दिले आहे. तरुण म्हणतो की, कृत्रिम बुद्धिमत्ता खूप उपयुक्त आहे, फक्त त्याचा योग्य वापर कसा करायचा हे माहित असणे आवश्यक आहे. आता त्याची पुढची योजना याहूनही मोठी आहे. तरुण हसत म्हणाला की, पुढच्या वर्षी तो पंतप्रधान मोदींसोबत स्वतःचा फोटो काढून थेट गावप्रमुख पदाची निवडणूक लढवेल. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या तरुणाच्या कल्पकतेला दाद दिली आहे, तर काही जणांनी गावातील लोक इतके भोळे कसे, असा सवालही उपस्थित केला आहे.
Leave a Reply