नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा पर्वाची सुरुवात ध्वजारोहण सोहळ्याने थाटामाटात झाली. या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख उपस्थितीत होत्या. या आयोजनाचे जगभरातून कौतुक झाले. मात्र, या एका दिवसाच्या सोहळ्यानंतर जिल्ह्यातील सिंहस्थाशी संबंधित विकासकामे पुन्हा थंडावली आहेत. परिणामी, सामान्य नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
ध्वजारोहण सोहळ्यानंतर नाशिककरांना खड्डे, वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील धुळीचे लोळ अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शासकीय यंत्रणांना याबाबत कोणतीही काळजी दिसून येत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
दीड वर्षांनंतर मिळालेले पालकत्व
तब्बल दीड वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या रूपाने जिल्ह्याला पालकत्व लाभले. त्यामुळे जिल्ह्याची बिघडलेली विकासाची घडी पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा जनतेला होती. मात्र, तेथेही केवळ कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या घोषणाच होताना दिसून येत आहेत. गेल्या दीड वर्षांत पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीत जिल्ह्याच्या लौकिकात भर पाडेल असा एकही प्रकल्प किंवा विकासकाम उभे राहिले नाही.
घोषणा भरपूर, कामे मात्र कागदावरच?
जिल्हा प्रशासनाने गेल्या आठवड्यात भगूर, चांदवडसह इतर काही तालुक्यांतील कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांची घोषणा केली. त्यामध्ये ग्रीन जीम, विद्युत वाहनांसाठी चार्जिंग केंद्र, महिला आणि युवकांसाठी विविध उपक्रम, कौशल्य विकास तसेच प्रशासकीय इमारतींचा समावेश आहे. कागदावर ही कामे चांगली वाटत असली तरी प्रत्यक्ष निधीची उपलब्धता, तांत्रिक बाबी आणि सध्याच्या अडीअडचणी लक्षात घेता ही कामे वेळेत पूर्ण होण्याबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
यंदाचा दुष्काळ पाहता या संकटाच्या मुकाबल्यासाठी यंत्रणांना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. त्याचवेळी जिल्हा प्रशासनाने कोट्यवधींच्या कामांना मंजुरी दिली असली तरी सध्याची दुष्काळी स्थिती आणि यंत्रणांमधील उदासीनता लक्षात घेता संबंधित कामे वेळेत पूर्णत्वास जाण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. आजवरचा अनुभव असा आहे की विकासकामांच्या घोषणा भरपूर होतात, यंत्रणांच्या पातळीवर लगबगही दिसून येते, मात्र ही कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने सामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर तुर्तास मान्यताप्राप्त विकासकामे तरी कागदापुरती मर्यादित ठरू नयेत, अशीच सर्वसामान्यांची भावना आहे.
Leave a Reply