राजकारणात पंतप्रधान मोदींना जसे मानणारे आहेत, तसेच त्यांच्या विरोधकांचीही संख्या कमी नाही. जाहीर सभा, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि समाजमाध्यमांवरून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करणारेही अनेक जण आहेत. पंतप्रधान मोदींचे कट्टर विरोधक म्हणून हे लोक ओळखले जातात. अशाच नेत्यांपैकी एकाने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. त्यांचे नाव आहे सॅम पित्रोदा.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते सॅम पित्रोदा हे इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. ते गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी सॅम पित्रोदा यांची चांगली मैत्री होती. हे सॅम पित्रोदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विरोधक म्हणून ओळखले जातात. पण आता त्यांनी पंतप्रधान मोदींची प्रशंसा केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दयाळू, प्रेमळ, मेहनती आणि चांगले वक्ते म्हटले आहे.
व्यक्तिगत संबंध चांगले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत माझे व्यक्तिगत संबंध खूप चांगले आहेत. माझ्या मनात पंतप्रधान मोदींबद्दल कुठलीही विरोध भावना नाही, असे सॅम पित्रोदा म्हणाले. सॅम पित्रोदा यांची ही भूमिका राजकारणात अनेकांना आश्चर्यचकित करणारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा पित्रोदा यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा एका मुलाखतीत म्हणाले की, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्यक्तिगत पातळीवर सन्मान करतात. मी अनेकवेळा मोदींना भेटलो आहे. गुजरातमध्ये त्यांच्या घरी सुद्धा जाऊन आलो आहे. सॅम पित्रोदा यांची पत्नी सुद्धा पंतप्रधान मोदींना भेटली आहे. माझ्याप्रती मोदींच्या मनात आत्मीयतेची भावना असल्याचे पित्रोदा म्हणाले.
वैचारिक मतभेद कायम
सॅम पित्रोदा पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल म्हणाले की, ते माझे गुजराती मित्र आहेत. एक व्यक्ती म्हणून मी त्यांचा आदर करतो. व्यक्तिगत पातळीवर ते आत्मीयतेने विचारपूस करणारे, दयाळू आणि प्रेमळ आहेत. ते एक चांगले वक्ते असण्याबरोबरच मेहनती सुद्धा आहेत. पंतप्रधान मोदींसोबत माझे चांगले जमतं. आमच्या दोघांमध्ये कुठलेही व्यक्तिगत मतभेद नाहीत. एक गुजराती नेता, मित्र आणि शुभचिंतक म्हणून मोदींबद्दल माझ्या मनात काहीही नाही, असे पित्रोदा म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना सॅम पित्रोदा यांनी हे सुद्धा स्पष्ट केले की, त्यांच्यात वैचारिक मतभेद आहेत. जगाकडे पाहण्याचा मोदींचा दृष्टीकोन आणि त्यांची विचारधारा यात मतभिन्नता असू शकते. पण व्यक्तिगत विरोध ही वेगळी गोष्ट आहे. हे कुठल्या एका व्यक्तीविरोधात नाही, त्यांच्या विचाराविरोधात आहे. या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी मिस्टर मोदी यांच्याशी असहमत असू शकतो. पण तरीही त्यांच्यासोबत बसून जेवू शकतो आणि हास्य-विनोद करू शकतो, असे पित्रोदा म्हणाले. राजकारण दिसते तसे नसते, हेच यातून दिसते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply