नाशिक जिल्ह्यातील ओझरखेड धरणाजवळ क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचे भव्य स्मारक साकारण्यात येणार आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. धरणाजवळील पाच एकर क्षेत्रात हे स्मारक उभारण्यात येईल. त्यासाठी २१ फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार असून चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
बिरसा मुंडा यांनी जल, जंगल आणि जमीन या आदिवासी समाजाच्या मूलभूत हक्कांच्या रक्षणासाठी संघर्ष केला. ब्रिटिशांच्या अन्यायकारक राजवटीविरोधात त्यांनी आदिवासी समाजाला संघटित करून लढा दिला. त्यांचे बलिदान, संघर्ष, स्वाभिमान आणि सामाजिक परिवर्तनाचे कार्य आजही संपूर्ण देशाला प्रेरणा देणारे आहे, असे पालकमंत्री म्हणाले.
पर्यटन आणि रोजगाराला चालना
या स्मारकासाठी चार कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. पुतळ्यासोबत तेथे वृक्षारोपण करण्यात येईल. धरण परिसरातील पर्यटन सुविधांचा विकास झाल्याने ओझरखेड परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होईल आणि स्थानिक पर्यटन, रोजगार व आर्थिक विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. जिल्हा विकास आराखड्यांतर्गत जिल्ह्याला मिळालेल्या प्रोत्साहनात्मक निधीतून जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.
राज्य शासनाच्या अॅस्ट्रो टुरिझम धोरणांतर्गत सुरगाणा तालुक्यातील उधमाळ या ठिकाणाचा विकास करण्यात येत आहे. लोकसंख्या कमी आहे म्हणून कोणत्याही नागरिकाला मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जाणार नाही, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. या सप्ताहात न्यूक्लियस बजेट योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना धनादेशांचे वितरण, स्मारकांची स्वच्छता आणि दीपोत्सव, आधार कार्ड व शासकीय कागदपत्र सेवा शिबिर, आरोग्य व पोषण जनजागृती शिबिर तसेच आदिवासी आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सक्षमीकरण दिवस साजरा होणार आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply