गुरुवार, १२ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

दिवाळीनंतर मटण-चिकनला पसंती; मालेगावात खवय्यांची झुंबड

दिवाळीच्या गोडधोड फराळानंतर मालेगावातील खवय्यांचा मोर्चा तिखट मटण-चिकनकडे वळला आहे. हॉटेल-ढाब्यांवर गर्दी वाढली असून मांसाहारी पदार्थांची मागणी वाढली आहे.

दिवाळीनंतर मटण-चिकनला पसंती; मालेगावात खवय्यांची झुंबड

मालेगाव : दिवाळीच्या गोडधोड पदार्थ खाऊन कंटाळलेल्या खवय्यांकडून आता मटण आणि चिकनवर ताव मारला जात आहे. दिवाळीच्या सुटीत गावाकडे आलेले अनेकजण गोड जेवण आणि फराळाला कंटाळून तिखट मसालेदार चिकन, मासे आणि मटणाच्या जेवणाला पसंती देत आहेत. अनेकांनी भाऊबीजेनंतर मळ्याखळ्यासह घराघरांत सामिष जेवणाची तयारी केली आहे.

परिणामी चिकन, मासे आणि मटण अशा मांसाहारी पदार्थांना मागणी वाढू लागली आहे. दिवाळीनिमित्त नातेवाईक व मित्रपरिवार एकत्र आल्याने शहरासह ग्रामीण भागातील विविध हॉटेल व ढाब्यांवरची गर्दी वाढत आहे. सुटीत नात्यागोत्यांचीही गाव परिसरात गर्दी वाढली आहे.

हॉटेल-ढाब्यांवर गर्दी

दिवाळीच्या फराळानंतर पाहुण्यांना सामिष भोजनाची जणू कसमादेत पद्धतच आहे. खास करून मटणाचेच बेत आखले जात आहेत. विशेषतः चुलीवरच्या मटणाचा स्वाद घेण्यास सर्वजण आतूर असतात. त्यातही मटणाचा खास खानदेशी मसाला वाटून-घाटून तर्रीदार भाजी बनविण्यासाठी कसमादे भागातील खवय्ये प्रसिद्ध आहेत. मटणासह चिकनला मागणी चांगली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. हिवाळ्यात विशेषतः चिकन आणि अंडी मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. त्यात दिवाळीनंतरच्या पाहुणचाराची जोड मिळाल्याने उलाढाल वाढली आहे. शहर परिसरातील कंदुरी, रायबा आणि गोंधळ या खास हॉटेलला पर्वणी असते.

लग्नसराईत गोंधळ-दिवट्यांची रेलचेल

एकादशी नंतर लवकरच लग्नसराई सुरू होत असल्याने लग्नानिमित्त गोंधळ आणि दिवट्या बुधल्या अशा कार्यक्रमांचीही रेलचेल वाढणार आहे. चंदनपुरी आणि भाक्षी या ठिकाणी खंडेराव महाराजांच्या साक्षीने अनेक जण स्वतःच्या मळ्यात आणि घरी मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमाचे आयोजन करतात. एकीकडे लग्नापेक्षा गोंधळ-दिवट्यांच्या कार्यक्रमांची आलेली निमंत्रणे मात्र न टाळता मंडळी उपस्थित राहते.

मांसाहारी पदार्थांचे दर

सध्या मटण ८०० रुपये, चिकन २४० रुपये, गावरान चिकन ६०० रुपये, कॉकलर ४०० रुपये, मासे ४०० रुपये आणि बोंबिल १५०० रुपये या दराने विकले जात आहेत. शेतकरी आणि शेतमजूर मोठ्या प्रमाणावर पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन व कोंबडी पालन करतात. जंगल व रान परिसरात शेळी चराई करतात. सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्याचे भाव, शेळी चराई आणि कोंबडीच्या खाद्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे बोकडच्या दरात मात्र फारशी वाढ झाली नाही, असे शेळी-कोंबडी पालक रवींद्र अहिरे यांनी सांगितले.

बोकडाचे दर काही प्रमाणात वाढले आहेत. थंडीचा काळ सुरू होईल, त्यामुळे मटणाचा बाजार तेजीत येऊन मांसाहारी पदार्थांना मोठी मागणी असल्याने विक्रेत्यांना चांगले दिवस आले आहेत. मटणाचे दर नियमित चार महिन्यांपूर्वी वाढले आहेत. महागलेल्या चाऱ्यामुळे बोकडाचे बाजारभाव वाढतात, असे मटण विक्रेते सलिम शेख यांनी सांगितले.

स्रोत: मूळ बातमी

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance