परभणी जिल्ह्यातील पाथरी नगरपरिषदेत शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. गटाच्या दोन नगरसेवकांनी अंतर्गत वादाला कंटाळून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हे दोन्ही नगरसेवक लवकरच आमदार राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच ही घडामोड समोर आल्याने परभणीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राजीनामा दिलेल्या नगरसेवकांची नावे आलम तरन्नून बेगम मुजीब आणि पठाण हसीब खान तहजीब खान अशी आहेत. गटातील अंतर्गत मतभेदांमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. दोन्ही नगरसेवकांच्या या भूमिकेमुळे पाथरीच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
जालन्यातही असाच धक्का बसला होता
काही दिवसांपूर्वी जालन्यातही शिंदे गटाला असाच धक्का बसला होता. तेथील दौऱ्याआधी मंठा-परतूर विधानसभा मतदारसंघातील तालुका प्रमुखांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिकरित्या राजीनामा दिला होता. जिल्हाप्रमुख आसाराम बोराडे यांच्या कार्यपद्धतीवर अनेक पदाधिकारी नाराज होते. बोराडे हे पदाधिकाऱ्यांना डावलून पक्षाचे सर्व कार्यक्रम करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
अंतर्गत वाद चव्हाट्यावर
जालन्यानंतर आता परभणीतही दोन नगरसेवकांनी गट सोडल्याने शिंदे गटातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान या घडामोडींना वेग आला असून, या घटनेनंतर परभणीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply