जळगाव जिल्ह्यातील पोखरी या बंजारा तांड्यात यंदाची दिवाळी वेगळ्याच रंगात साजरी झाली. दुष्काळाचे सावट असतानाही गावात आनंदाचे वातावरण होते. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी तांड्यात जाऊन ग्रामस्थांसोबत दिवाळी साजरी केली. कोणताही शासकीय थाटमाट न ठेवता ते बंजारा समाजातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांमध्ये मिसळले.
पालकमंत्री आल्यावर पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिलांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. त्यानंतर महिला आणि पुरुषांनी एकत्र येऊन पारंपरिक बंजारा आणि पावरा गीतांवर नृत्य सादर केले. लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि ग्रामस्थांचा स्नेह पाहून पालकमंत्री भारावून गेले. त्यांनी सर्वांशी संवाद साधत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या
दिवाळी फराळाचा आस्वाद घेत असतानाच पालकमंत्र्यांनी दुष्काळामुळे चिंतेत असलेल्या ग्रामस्थांच्या अडचणी ऐकून घेतल्या. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी दिला.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील, सरपंच गोकुळ शिंदे, उपसरपंच नवल पारधी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पाटील, संतोष वंजारी, किसन राठोड, रामलाल चव्हाण, इंदल चव्हाण आणि धनराज राठोड उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply