गंगापूर तालुक्यातील दुष्काळ आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून न घेता केवळ अधिकाऱ्यांकडूनच माहिती गोळा केली जात असल्याचा आरोप करत जिल्हा परिषद सदस्य कृष्णा पाटील डोणगावकर यांनी गुरुवारी बैठकीतून सभात्याग केला. आमदार प्रशांत बंब यांच्या उपस्थितीत प्रमुख शासकीय विभागांची ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत जनतेच्या प्रश्नांवरून आमदार बंब व डोणगावकर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली.
यानंतर तातडीने पत्रकार परिषद घेत डोणगावकर यांनी प्रशासकीय नियोजनावर प्रश्न उपस्थित केले. दुष्काळाच्या बैठकांचा कोणताही कृती अहवाल जनतेसमोर येत नाही. केवळ नव्या बैठका आणि आश्वासने दिली जातात, असे त्यांनी म्हटले. गंगापूर-वैजापूरसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वॉटर ग्रीड योजनेचे विहिरी व रायझिंग मेनचे काम रखडले असल्याचा आरोपही त्यांनी केला.
वॉटर ग्रीडचे काम रखडल्याचा आरोप
दुष्काळाच्या काळात जायकवाडीचे पाणी साखर कारखान्याच्या उपसा सिंचन योजनेद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोचवावे, अशी मागणी डोणगावकर यांनी केली. तसेच नांदूर मधमेश्वरचे आवर्तन केवळ नदीत न सोडता परिसरातील पाझर तलाव व बंधाऱ्यांमध्ये सोडून जलपुनर्भरण करावे, असे त्यांनी सुचवले. आमदारांनी लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून न घेता स्वतःची मते लादल्याचा आरोपही त्यांनी केला. दुष्काळ हा राजकारणाचा नाही, तर सर्वसामान्यांच्या जगण्याचा प्रश्न आहे. केवळ बैठका घेऊन दुष्काळ संपणार नाही. मागील निर्णयांचा हिशोब द्यावा, रखडलेली वॉटर ग्रीड पूर्ण करावी आणि चारा-पाण्याचे ठोस नियोजन करावे, असे त्यांनी म्हटले. लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता दुष्काळावर मात करणे अशक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
आमदार बंब यांची प्रतिक्रिया
चारा आणि पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यासाठीच ही प्रशासकीय बैठक होती, असे आमदार प्रशांत बंब यांनी स्पष्ट केले. बैठकीत परिस्थितीचा आढावा अधिकाऱ्यांकडूनच घ्यावा लागतो. लोकप्रतिनिधींनी प्रश्न मांडण्यासाठी ही बैठक नव्हती, असे त्यांनी म्हटले. आधीच्या बैठकीचा तपशील हवा असल्यास तो लेखी मागावा; पत्राद्वारे उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. चारा छावण्या अद्याप सुरूच झालेल्या नसल्याने आरोपांमध्ये काही तथ्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply