धाराशिव : बालकांचे हक्क सुरक्षित राहावेत, त्यांना भयमुक्त आणि सुरक्षित वातावरण मिळावे तसेच संकटात सापडलेल्या बालकांना वेळीच मदतीचा हात मिळावा, या उद्देशाने जिल्ह्यात चाइल्ड हेल्पलाइन कक्ष १०९८ च्या वतीने विविध शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना बालहक्क, बालविवाह प्रतिबंध, बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियान आणि बालकांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. प्रभारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी किशोर गोरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे आणि चाइल्ड हेल्पलाइनचे प्रकल्प समन्वयक व्ही. पी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये हे कार्यक्रम घेण्यात आले.
१२ शाळा आणि संस्थांमध्ये जनजागृती
या उपक्रमांतर्गत धाराशिव येथील नगरपालिका शाळा क्रमांक १९, विजयसिंहराजे प्राथमिक विद्यालय, स्वामी रामानंद तीर्थ प्राथमिक विद्यामंदिर, जीवनराव गोरे विद्यालय, सह्याद्री नर्सिंग कॉलेज, भूम येथील सौ. राणीतारा प्रशाला, गुरुदेव विद्यालय, रवींद्र विद्यालय, येडशी पब्लिक स्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावसूद, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगोली आणि सरस्वती प्रायमरी स्कूल, शिंगोली अशा एकूण १२ शाळा व शैक्षणिक संस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली.
हेल्पलाइन १०९८ ची माहिती
यावेळी बालकांचे हक्क, त्यांचे संरक्षण, बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम आणि मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानाच्या माध्यमातून मुलींचे शिक्षण, संरक्षण आणि सक्षमीकरण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बालकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांची माहितीही देण्यात आली. बालकांवर होणारा अन्याय, अत्याचार, बालविवाह किंवा अन्य संकटाच्या प्रसंगी मदतीसाठी चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८ वर संपर्क साधता येतो. संकटात सापडलेल्या बालकांना वेळेवर मदत मिळावी, यासाठी या हेल्पलाइनची माहिती प्रत्येक बालकापर्यंत पोचणे आवश्यक आहे. यावेळी समुपदेशक वंदना कांबळे, पर्यवेक्षक अमर भोसले आणि पल्लवी पाटील यांनी विद्यार्थ्यांना हेल्पलाइनच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply