साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होऊन महिना उलटून गेला तरी अहिल्यानगर जिल्ह्यात कोणत्याही साखर कारखान्याने ऊसाचा दर जाहीर केलेला नाही. साखर कारखानदार केवळ शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. साखर कारखान्यांनी ऊसाला दर जाहीर करावा, या मागणीसाठी मंगळवारी, १० नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर महामार्गावर नेवासा फाटा येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे राज्य कार्यकारिणी सदस्य अंकुश काळे यांनी ही माहिती दिली.
अंकुश काळे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आणि जिल्हा प्रशासनाला याबाबत निवेदन दिले आहे. गाळप हंगाम सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. साखर कारखाने ऊसाचे गाळप करत आहेत, मात्र दरवर्षीप्रमाणे ऊसदर जाहीर करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
प्रति टन पाच हजार रुपये दराची मागणी
सध्या सगळीकडे दुष्काळी परिस्थिती आहे. अशा काळात शेतकऱ्यांनी अल्प पाण्यावर ऊस जगवला आहे. सध्याची परिस्थिती पाहता ऊसाला किमान पाच हजार रुपये प्रति टन दर मिळणे गरजेचे आहे, असे काळे यांनी सांगितले. अहिल्यानगर जिल्ह्यातील कारखानदार मात्र याबाबत गप्प आहेत.
कारखानदारांनी ऊसाला तातडीने दर जाहीर केला नाही तर मंगळवारी नेवासा फाटा येथे रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे काळे यांनी स्पष्ट केले. या वेळी सुरज शेटे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply