जळगाव शहरातील कचरा संकलन आणि स्वच्छतेची समस्या अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे. याचे पडसाद काही दिवसांपूर्वी झालेल्या महासभेत तसेच स्थायी समितीच्या सभेत उमटले होते. त्या सभांमध्ये सदस्यांनी स्वच्छतेचा मक्ता घेतलेल्या बीव्हीजी कंपनीच्या कामावर नाराजी आणि संताप व्यक्त केला होता. बीव्हीजी कंपनीकडून अनेक रस्त्यांवरील कचऱ्याचे ढीग उचलले जात असले तरी कचऱ्याचे ढीग कायम असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. त्यामुळे शहरात नियमित कचरा संकलनासाठी महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि सफाई मक्तेदार यांच्या व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
२२ दिवसांपासून ढीग तसाच
शहरातील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी महापौर स्वच्छता संकल्प अभियानांतर्गत शहरातील सर्व प्रभागांमध्ये महापौर दीपमाला काळे यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नियमित कचरा संकलन, तक्रारींचे त्वरित निराकरण आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट यावर भर देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
प्रभाग क्रमांक १६ मधील विठ्ठल पेठ, जुने जळगाव परिसरातील श्रीकृष्णनगर येथे मुख्य रस्त्यालगत नाल्याच्या बाजूला गेल्या २२ दिवसांपासून कचऱ्याचा मोठा ढीग पडून आहे. कचरा उचलण्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक, मुकादम तसेच लोकप्रतिनिधींना फोनवरून वारंवार तक्रारी केल्या. मात्र, अद्याप कचरा उचलण्यात आलेला नसल्याने परिसरातील नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. श्रीकृष्णनगरातील मुख्य रस्त्यालगतच कचरा पडून असल्याने परिसराच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
जाळलेल्या कचऱ्याचा धूर
दरम्यान, महापौर स्वच्छता अभियानांतर्गत प्रभाग क्रमांक ६ मधील शाहूनगर येथील ट्रॅफिक गार्डन परिसरातील स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता करून जमा केलेला कचरा सफाई कर्मचाऱ्यांनी नंतर जाळला. कचऱ्याचे प्रमाण मोठे असल्याने हा कचरा तब्बल तीन दिवस जळत होता. जळणाऱ्या कचऱ्यातून परिसरात धुराचे लोट पसरत असल्याने नागरिकांना धुराचा त्रास सहन करावा लागला.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply