एकेकाळी माण-हिंजवडी परिसरात बैलगाडी जाण्यासाठीही व्यवस्थित रस्ता नव्हता. पावसाळ्यात चिखलातून वाट काढावी लागत असे आणि शहराशी संपर्क साधणेही अवघड होते. मंगळवारी याच परिसरात मेट्रो धावण्याचा ऐतिहासिक क्षण साकारला. विकासाच्या या प्रवासात मेट्रोच्या रूपाने एक नवा अध्याय जोडला गेला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील माहिती तंत्रज्ञान उद्यानाच्या उभारणीसाठी ज्यांनी आपल्या जमिनी दिल्या, त्यांच्याच भूमीतून आता आधुनिक प्रवासाचे साधन धावणार आहे. काळाच्या ओघात गावांचे रूप पूर्णपणे पालटले आहे. शेतीच्या बांधांवर माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या उंच इमारती उभ्या राहिल्या आहेत आणि आता त्याच मार्गावर मेट्रो धावू लागली आहे.
गावाचे बदललेले रूप
बैलगाडीच्या चाकांनी पडलेल्या चाकोरीचे रूपांतर पक्क्या रस्त्यात झाले आणि त्या रस्त्यांवर उभारलेल्या खांबांवरून आज मेट्रो धावत आहे. ही काळाने घेतलेली मोठी झेप आहे. एका पिढीने गावाचा बदल प्रत्यक्ष अनुभवला, जमिनी दिल्या आणि संघर्ष केला. तर नव्या पिढीला आधुनिक वाहतूक सुविधेतून प्रगतीच्या नव्या संधी मिळणार आहेत. मेट्रो सुरू झाल्याने शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा स्थानिक युवक व्यक्त करत आहेत.
पूर्वी पुण्याकडे जायचे म्हटले की प्रवासाचे नियोजन करावे लागत असे आणि तासन्तास वाहतूक कोंडीत अडकावे लागत असे. मेट्रोमुळे महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होईल, असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. जुन्या पिढीच्या डोळ्यांसमोर मेट्रोचा सोहळा पाहताना गावाचा जुना चेहरा उभा राहणे स्वाभाविक असल्याचेही अनेकांनी सांगितले.
सुविधांची अपेक्षा कायम
मेट्रो हे माण-हिंजवडीच्या बदलत्या रूपाचे प्रतीक आणि आधुनिकतेचा अविष्कार आहे. मात्र या आगमनाबरोबरच जोडरस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि नागरी सुविधांचाही विकास झाला, तरच या परिवर्तनाला खऱ्या अर्थाने पूर्णत्व मिळेल. मेट्रोसाठी आवश्यक जोडव्यवस्था, पार्किंग आणि फीडर सेवेचा पर्याय मिळावा, अशी मागणीही पुढे आली आहे. कधीकाळी बैलगाडीला रस्ता शोधणाऱ्या गावातून आज मेट्रो धावत आहे; या विकासाचा लाभ गावातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावा, हीच ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply