नाशिकवेस ते लालचौक आणि गंगावेस ते नवीन पुलापर्यंत पसरलेल्या प्रभाग क्रमांक आठमध्ये शहरातील अत्यंत दाट लोकवस्ती, मुख्य बाजारपेठ आणि शहराचे मुख्य प्रवेशद्वार येते. मात्र नाशिकवेस भागातील भाजीबाजार, रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यामुळे नागरिक आणि वाहनधारक कमालीचे त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर प्रभागात राबविण्यात आलेला बंच केबलचा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे.
बंच केबलचा पहिला प्रयोग
प्रभागातील प्रत्येक रस्त्यावर वीज केबलचे जाळे पसरलेले होते आणि रथासाठी हे जाळे अडचणीचे ठरत होते. रथमार्गांवर ठिकठिकाणी हे जाळे हटविण्यात आले असून बंच केबलचा वापर केल्याने ही कामगिरी साध्य झाली आहे. शहरात बंच केबलचा पहिला प्रयोग याच प्रभागात राबविण्यात आला. प्रभागात इतरही ठिकाणी वीज तारांचे जाळे असून ते हटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पूर्वी नळाला पाणी आले की वीज गायब होत असे, अशी येथील अवस्था होती. मात्र ट्रान्सफार्मरची क्षमता वाढविल्याने ही समस्या सुटली असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पाणी योजनेचा वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचेही सांगण्यात आले.
रथमार्ग आणि पार्किंगचे प्रश्न कायम
सांस्कृतिक महोत्सव, ऐतिहासिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाच्या मिरवणुकीची सुरुवात याच प्रभागातून होते. मात्र गंगावेस-लालचौक-भिकुसा कॉर्नर या प्रमुख रथमार्गाची अवस्था अत्यंत वाईट झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रथमार्गाचे तातडीने काँक्रिटीकरण करण्याची मागणी जोर धरत आहे. नाशिकवेस भागात भरणारा भाजीबाजार वाहतुकीसाठी कायम अडथळा ठरत असून हा बाजार हटवण्याचे अनेक प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. थेट रस्त्यात लागणाऱ्या बाजारासह दुकानदारांकडून रस्त्यावरच दुकाने थाटली जात असल्याने चारचाकी वाहनांना ये-जा करणे कठीण होते. नवीन पूल ते बाकळे बेकरीदरम्यान रस्त्यातच दुचाकी वाहने उभी केली जात असल्याने कोंडीत अधिकच भर पडत आहे.
प्रभागासाठी गंगावेस ते भिकुसा कॉर्नरपर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण, नाशिकवेस भागातील व्यायामशाळेचे पुनरुज्जीवन, महिलांसाठी स्वच्छतागृह आणि नाशिकवेस ते भिकुसा कॉर्नर भूमिगत वीज व्यवस्था असे नियोजित प्रस्ताव आहेत. गटारीवरील तुटलेले चेंबर दुरुस्त करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply