शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील सत्तासंघर्ष उफाळून आला आहे. सभापती नंदलाल डोहळे आणि उपसभापती शरद वेखंडे यांच्याविरोधात १८ पैकी १२ संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. कामकाज करताना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करीत या संचालकांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी १२ नोव्हेंबरला अविश्वास ठरावावर निर्णय घेण्यासाठी विशेष सभा घेण्याची नोटीस बजावली आहे.
युतीचे वर्चस्व, मात्र नाराजीचा सूर
शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपचे नंदलाल डोहळे सभापती, तर शिवसेना शिंदे गटाचे शरद वेखंडे उपसभापती आहेत. १८ संचालकांपैकी १० संचालक भाजप-शिवसेना युतीचे असून, तीन वर्षांपासून समितीवर युतीचे वर्चस्व आहे. मात्र, सभापती आणि उपसभापती यांनी संचालकांना विश्वासात न घेता कारभार सुरू ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, मंजूर ठरावांची अंमलबजावणी होत नसल्याने बाजार समिती तोट्यात गेल्याचा दावा संचालकांनी केला आहे. सरकारकडून बाजार समितीच्या विकासासाठी कोणताही नवीन प्रकल्प आणण्यात आला नसल्याचा आक्षेपही अविश्वास ठरावात नोंदविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय १२ संचालकांनी एकत्र येत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अविश्वास ठराव दाखल केला.
१२ नोव्हेंबरला विशेष सभा
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम २३ (३) मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष सभेची नोटीस निर्गमित केली आहे. त्यानुसार १२ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता बाजार समितीच्या सभागृहात अविश्वास ठरावावर चर्चा व मतदान होणार आहे. या विशेष सभेत अविश्वास ठराव मंजूर होणार की सभापती आणि उपसभापती आपली पदे कायम राखणार, याकडे शहापूर तालुक्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply