शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रस्तावित सीमांकन विधेयकावर जोरदार हल्ला चढवला आहे. या प्रक्रियेला त्यांनी घटनात्मक नव्हे, तर दुर्घटनात्मक असे संबोधले असून, या विधेयकाला तीव्र विरोध दर्शवला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या हितासाठी या विधेयकाविरोधात मतदान करावे, असे थेट आवाहनही ठाकरे यांनी केले आहे.
महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व घटण्याची भीती
सध्याच्या स्वरूपातील सीमांकनामुळे महाराष्ट्राचे संसदीय प्रतिनिधित्व कमी होईल, अशी चिंता ठाकरे यांनी व्यक्त केली. उत्तर प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्राच्या लोकसभा जागांमध्ये मोठी घट होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. त्यामुळे राज्याचे राष्ट्रीय राजकारणातील महत्त्व कमी होईल, असा इशारा त्यांनी दिला.
२०१८ मधील मुंबई महापालिकेच्या वॉर्ड रचनेचा दाखला देत ठाकरे म्हणाले की, यापूर्वीही अशा पक्षपाती प्रयत्नांचा अनुभव आला आहे. सीमांकन ही केवळ घटनात्मक प्रक्रिया नाही; त्याचे दूरगामी परिणाम होतील, असे त्यांनी नमूद केले. सध्याची घडामोड देशाच्या लोकशाहीसाठी धोकादायक असून, भविष्यात अश्रू ढाळण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असेही ते म्हणाले.
इंडिया आघाडीला ठाकरेंचे आवाहन
इंडिया आघाडीच्या नेत्यांनी या मुद्यावर त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे. दोन दगडांवर पाय ठेवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. या मुद्यावर आघाडीने ठोस भूमिका घ्यावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा