छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गुप्तहेर बहिर्जी नाईक यांची शौर्यगाथा आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अंश मीडिया वर्क्स निर्मित आगामी ऐतिहासिक चित्रपट ‘बहिर्जी’चे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.
मोशन पोस्टरमध्ये काय दिसतंय?
प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरमध्ये एकामागोमाग एक ऐतिहासिक व्यक्तिरेखांचे चेहरे दिसतात. त्यांच्या चेहऱ्यांवरील गंभीर भाव आणि भारदस्त लूकमुळे चित्रपटाबाबत आणि कलाकारांबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे. मात्र या नेमक्या कोणत्या व्यक्तिरेखा आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
शत्रूच्या गोटात प्रवेश करून त्यांची रणनीती जाणून घेणारे आणि आपल्या बुद्धीचातुर्याने स्वराज्याच्या मोहिमांना यश मिळवून देणारे बहिर्जी नाईक यांचे कार्य, स्वराज्यनिष्ठा आणि धाडस या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्टरसोबत स्वराज्याच्या तिसऱ्या डोळ्याचा उल्लेख करत उत्सुकता वाढवणारे कॅप्शनही देण्यात आले आहे.
लेखन आणि दिग्दर्शन
या चित्रपटाचे लेखन युवराज पाटील यांनी केले असून राहुल जाधव दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळत आहेत. चित्रपटाबाबत बोलताना राहुल जाधव यांनी सांगितले की, बहिर्जी नाईक यांचे व्यक्तिमत्त्व जितके विलक्षण आहे, तितकेच त्यांचे कार्य रहस्यमय आहे. या चित्रपटासाठी ऐतिहासिक संदर्भांचा सखोल अभ्यास आणि संशोधन करण्यात आले असून त्या काळातील वातावरण, मोहिमा आणि व्यक्तिरेखांचे विश्व उभे करण्यासाठी विशेष मेहनत घेण्यात आली आहे.
हा केवळ एका गुप्तहेराचा प्रवास नसून स्वराज्यासाठी केलेल्या त्यागाची आणि निष्ठेची कथा असल्याचे दिग्दर्शकाने नमूद केले आहे. मोशन पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा