वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाला आधुनिक स्वरूप मिळाले आहे. या ट्रेनमधील फर्स्ट एसी डब्यात आकर्षक सजावट, आरामदायी बर्थ, स्वयंचलित दरवाजे आणि आधुनिक सुरक्षा यंत्रणा अशा अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. भारतीय रेल्वेने प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू केली आहे. या ट्रेनमुळे रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासाला आधुनिक सुविधांची जोड मिळाली आहे. राजधानी आणि दुरंतो यांसारख्या गाड्यांमधील पारंपरिक फर्स्ट एसी डब्यांच्या तुलनेत वंदे भारत स्लीपरमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. मग पारंपरिक फर्स्ट एसी आणि वंदे भारत स्लीपरच्या फर्स्ट एसीमध्ये नेमका काय फरक आहे, ते जाणून घेऊया.
## डब्याची रचना आणि सुविधा
पारंपरिक फर्स्ट एसीमध्ये स्वतंत्र केबिन आणि कूपेची व्यवस्था असते. मात्र, वंदे भारत स्लीपरच्या फर्स्ट एसीमध्ये आधुनिक अंतर्गत सजावट, आकर्षक एलईडी प्रकाशयोजना आणि डिजिटल प्रवासी माहिती प्रणाली देण्यात आली आहे. त्यामुळे डब्याला अधिक आधुनिक स्वरूप मिळाले आहे. रात्रीच्या प्रवासात चांगली झोप मिळणे महत्त्वाचे असते. वंदे भारत स्लीपरमध्ये शरीराला योग्य आधार मिळेल अशा पद्धतीने बर्थ तयार करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सुधारित कुशनिंगचा वापर केला आहे. पारंपरिक फर्स्ट एसीमध्येही आरामदायी बर्थ असतात, मात्र वंदे भारतमध्ये त्यांची रचना अधिक आधुनिक आहे. पारंपरिक रेल्वे डब्यांचे दरवाजे हाताने उघडावे आणि बंद करावे लागतात. वंदे भारत स्लीपरमध्ये मात्र स्वयंचलित सरकते दरवाजे बसवण्यात आले आहेत. दोन डब्यांमधील जोडमार्गही अधिक रुंद आणि बंदिस्त ठेवण्यात आले आहेत.
## सुरक्षा आणि आधुनिक तंत्रज्ञान
वंदे भारत स्लीपरमध्ये तीन पिनचे चार्जिंग सॉकेट, यूएसबी टाइप-ए आणि टाइप-सी पोर्ट उपलब्ध आहेत. प्रत्येक बर्थसाठी स्वतंत्र वाचन दिव्यांची व्यवस्था आहे. पारंपरिक फर्स्ट एसीमध्ये चार्जिंग सॉकेट आणि वाचन दिवे असले तरी यूएसबी पोर्टची सुविधा सर्व डब्यांमध्ये उपलब्ध नसते. वंदे भारत स्लीपरमध्ये कवच सुरक्षा प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे, आग शोधणारी यंत्रणा, अग्निरोधक दरवाजे आणि आपत्कालीन टॉक-बॅक सुविधा देण्यात आली आहे. वातानुकूलन यंत्रणेत यूव्ही-सी तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे. पारंपरिक फर्स्ट एसीमध्ये या सर्व सुविधा एकाच स्वरूपात उपलब्ध असतीलच असे नाही. त्यामुळे वंदे भारत स्लीपरचा फर्स्ट एसी डबा प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव देणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा